.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या विद्यार्थी आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा राहिलेल्या सोनिया दुहान (Sonia Duhan) यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर थेट सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला रामराम ठोकला होता. त्यानंतर हरियाणामध्ये त्या सक्रिय झाल्या.
आगामी काळात महाराष्ट्रासह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. यामध्ये हरियाणाचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर सोनिया दुहान हरियाणा विधानसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. दरम्यान, सोनिया दुहान यांनी मंगळवारी दिल्लीत हरियाणा काँग्रेसचे प्रभारी दीपक बावरिया, ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा, हरियाणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष उदय भान यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार सुरुवातीच्या काळात अस्तित्वात येत असताना सोनिया दुहान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांच्याकडे विद्यार्थी आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतरही त्यांनी शरद पवार गटासोबत राहणे पसंत केले होते. शरद पवारांच्या निकटवर्तीय लोकांमध्ये त्यांचा समावेश होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवार गटाला राम राम ढोकला त्यानंतर त्या हरियाणामध्ये अधिक सक्रिय झाल्या होत्या. 'हरियाणा की बेटी' अशा स्वरूपाचा प्रचार त्यांनी सुरू केला होता. एक प्रकारे विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले होते.