Sonali Kulkarni | महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास जगाला कळाला पाहिजे - सोनाली कुलकर्णी

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा 
Sonali Kulkarni
Sonali Kulkarni
Published on
Updated on

नवी दिल्ली : महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास आणि संस्कृती जगाला कळाली पाहिजे. १०७ हुतात्म्यांच्या बलिदानाने महाराष्ट्र मिळाला आहे. महाराष्ट्र दिन महाराष्ट्रासह जगाच्या पाठीवर सर्वत्र झाला पाहिजे. यासाठी प्रत्येक मराठी माणसाने पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले. महाराष्ट्र दिनानिमित्त दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

विद्यापीठात आयोजित या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी कविता, लावणी, गझल, नाटक असे मराठी सांस्कृतिक कार्यक्रम देखील उत्साहात सादर केले. या कार्यक्रमाला दिल्ली आणि परिसरातील मराठी अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रात काम करणारे मराठी नागरिक उपस्थित होते. 

याप्रसंगी बोलताना सोनाली कुलकर्णी म्हणाल्या की, आपल्या पाल्यांवर मराठी संस्कार करणे ही आपली जबाबदारी आहे. आपला इतिहास, संस्कृती पुढच्या पिढ्यांना कळली पाहिजे. मराठी चित्रपट, मराठी नाटक आपण पाहिले पाहिजेत. तंत्रज्ञानाच्या युगात हे जगभरात शक्य आहे. मात्र काही पालकांना आपली पाल्य मराठी बोलत नाही, यांचे कौतुक वाटते, हे अनपेक्षित आहे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. स्वतःच्या अनुभवाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, आई वडिलांच्या कामामुळे वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेतले. त्यामुळे सुरुवातीला मला मराठी नीट येत नव्हते पण मराठी चित्रपटसृष्टीने मला उत्तम मराठी शिकवली. माझ्यासाठी ही चित्रपटसृष्टी म्हणजे मराठी शिकण्याचे विद्यापीठ आहे. तसेच आज आपण कुठेही असलो तरी आपली भाषा जपली पाहिजे. यामध्ये विविधता ही मला कधी अडचण वाटली नाही. उलट विविधता माणसाला समृद्ध करते, हे देखील त्यांनी आवर्जून सांगितले. 

राजकारणात घराणेशाही वाढली! 

राजकारणाबद्दल बोलताना सोनाली कुलकर्णी म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या राजकारणात घराणेशाही वाढली आहे. समाजाने राजकीय दृष्ट्या जागरूक होणे आवश्यक आहे. जेन झीला राजकारणात आवड दिसत नाही, हे गंभीर आहे. तसेच समाज माध्यमांवर सक्रीय राहताना कुठल्याही गोष्टीवर सखोल माहिती न मिळवता तातडीने प्रतिक्रिया देणे, ही गोष्ट देखील गंभीर असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. सदर कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक, दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे वैभव डांगे, प्राध्यापक शरद बाविस्कर, रश्मीनी कोपरकर, अमित थोरात, वरदा संभूस, बालाजी बिराजदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमात पंकज फणसे आणि राजेश बोनावते यांनी सोनाली कुलकर्णी यांची मुलाखत घेतली. तर अशोक माने, ऋषिकेश मोरे, अक्षय लगाड, चैतन्य देशपांडे, शर्वरी पाटील, विजयालक्ष्मी शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news