

नवी दिल्ली : ही घटना 13 ऑक्टोबर रोजी दिल्ली-दिब्रुगड राजधानी ट्रेनमध्ये घडली. या ट्रेनमधून प्रवास करत असलेल्या लष्करी जवानाला अचानक आरडाओरडा ऐकू आला. त्याने लगेच तिकडे मोर्चा वळवला. तेथे एक बालक निपचित पडले होते आणि त्याचे पालक मदतीसाठी टाहो फोडत होते. या जवानाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्या बालकाच्या छातीवर हात ठेवून त्याला कृत्रिम श्वास पुरवण्यास सुरुवात केली. याला शास्त्रीय भाषेत सीपीआर असे म्हटले जाते.
या उपचारांना त्या बालकाने काही वेळातच प्रतिसाद दिला आणि त्याच्या आईच्या चेहर्यावर आनंद फुलला. हा जवान एवढ्यावरच थांबला नाही. त्याने पुढील स्टेशनवर या चिमुकल्याला रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्थादेखील केली. वास्तविक आपली सुट्टी संपवून हा सुनील नावाचा जवान कर्तव्यावर रुजू होण्यासाठी निघाला होता. तो लष्करी रुग्णालयात कार्यरत आहे. त्याच्या अनुभवाचा फायदा या चिमुकल्याच्या कुटुंबाला मिळाला. या बालकासाठी देवदूत बनलेल्या या जवानावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.