

Marriage Fraud Case: बंगळुरूमधील एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरला एका पुरूषानं लग्नाचं खोटं आश्वासन देऊन तब्बल दीड कोटी रूपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानं तो एक श्रीमंत उद्योगपती असल्याचा बनाव केला. तसंच आपल्या पत्नीची बहीण म्हणून ओळख करून दिली होती.
दरम्यान, पोलिसांनी विजय राज गौडा याच्याविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर त्याचे वडील बोरेगौडा आणि सौम्या नावाच्या महिलेविरोधात देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही महिला विजयची पत्नी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्हाईटफिल्ड इथं राहणाऱ्या २९ वर्षाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरनं ही तक्रार दाखल केली असून ती मार्च २०२४ मध्ये विजयला मॅट्रोमोनिटल साईटवरून पहिल्यांदा भेटली होती.
पोलिसांमधील दाखल केलेल्या तक्रारीवरून, विजयने स्वतःची एक श्रीमंत उद्योगपती अशी ओळख करून दिली होती. तो VRG ग्रुप एंटरप्राईजेस ही कंपनी चालवत असल्याचा दावा करत होता. त्याच्या कंपनीची नेट वर्थ ७१५ कोटी रूपये असल्याचे तो सांगत होता.
तक्रारदार सॉफ्टवेअर इंजिनअर मुलीने सांगितले की, विजयने तिचा हळूहळू विश्वास संपादन केला. त्याने त्याच्या कुटुंबियांची ओळख करून दिली. त्यानं वडिलांची ओळख करून दिली. त्या भेटीवेळी विजयने सौम्याची देखील ओळख करून दिली. मात्र त्याने आपलं लग्न झाल्याचं लपवलं अन् सौम्याची पत्नी म्हणून नाही तर बहीण म्हणून ओळख करून दिली असा आरोप केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजयने दावा केला की त्याचे बँक अकाऊंट हे फ्रोज करण्यात आलं आहे. याचा बहाणा करून त्यानं तक्रारदार मुलीकडून पैशाची मदत मागितली. त्याने या मुलीवर त्याला कर्ज घ्यावं लागेल, मित्रांकडून पैसे घ्यावे लागतील असं सांगत दबाव निर्माण केला. त्यानंतर महिलेनं विजयला १.५ कोटी रूपये ट्रान्सफर केले.
ज्यावेळी ही सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेली महिला पोलीस ठाण्यात पोहचली त्यावेळी पोलिसांनी आधी फसवणुकीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी कुटुंबातील तीनही व्यक्तींविरूद्ध तक्रार दाखल केली असून पोलीस कुटुंबातील कोणत्या व्यक्तीची या गुन्ह्यात कोणती भूमिका होती याचा देखील तपास करत आहेत.