

सिमला : हिमाचल प्रदेशातील डोंगर भागात पुन्हा हिमवर्षाव सुरू झाला आहे. गुरुवारी सकाळपासून सिमलाच्या नारकंडा आणि कुफरीमध्ये हिमवर्षाव होत आहे. सिमलाचे किमान तापमान 3 अंश आणि कमाल 11 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. हिमवर्षावामुळे रस्ते निसरडे झाले आहेत.
सिमला शहर, कांगडा आणि हमीरपूरसह राज्यातील अन्य भागांत पाऊस सुरूच आहे. त्यामुळे काळजीपूर्वक गाडी चालवण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे. देशातील 23 राज्यांमध्ये हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये दिल्ली, हरियाणा, चंदीगडमध्ये पाऊस पडत आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, बिहार, झारखंडमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. श्रीनगरमध्ये थंडीची लाट सुरूच असून, हलका पाऊस पडला आहे. तेथील किमान तापमान 4 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आल्याचे हवामान खात्याने सांगितले.
भोपाळसह मध्य प्रदेशातील अनेक शहरांमध्ये ढग दाटले आहेत. पुढील 24 तासांत दिवसा आणि रात्रीच्या तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसनी घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. दुसरीकडे, इंदूर-उज्जैनमध्ये दिवसा उष्णतेचा परिणाम दिसून आला. राजस्थानमध्ये बिकानेर, जयपूर, जोधपूर आणि भरतपूर विभागातील जिल्ह्यांतील हवामान बदलले आहे. तेथे ढग जमा झाल्यानंतर, जोरदार वारे वाहू लागले असून, हलका पाऊस पडला आहे. बिकानेर, चुरू आणि सिकरमध्ये जोरदार वादळ आले. जयपूरमध्ये रात्री उशिरा हवामान बदलल्यानंतर, काही ठिकाणी हलका पाऊस आणि रिमझिम पाऊस पडला.
पंजाबमध्ये पावसासाठी यलो अलर्ट इशारा जारी करण्यात आला आहे. जोरदार वार्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे. त्याच वेळी, गेल्या 24 तासांत सरासरी कमाल तापमानात 1.1 अंश सेल्सिअसची घट नोंदवली आहे.