

नवी दिल्ली : येणारा बुधवार म्हणजेच १२ ऑगस्ट २०२६ ही तारीख जगभरातील खगोलशास्त्राच्या शौकिनांसाठी अत्यंत खास ठरणार आहे. या एकाच दिवशी २४ तासांच्या आत तीन मोठ्या खगोलीय घटना एकाच वेळी घडणार आहेत. सकाळी सूर्योदयाच्या आधी सहा ग्रहांची रांग दिसेल, दिवसा पूर्ण सूर्यग्रहण लागेल आणि रात्री तुटणाऱ्या ताऱ्यांची म्हणजेच पर्सिड उल्का वर्षावाची आतषबाजी होईल. या तिन्ही घटना एकाच तारखेला घडणे हा अत्यंत दुर्मीळ योगायोग असल्याचे खगोलशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सामान्यतः या तिन्ही खगोलीय घटना वेगवेगळ्या वेळी घडतात. परंतु १२ ऑगस्ट २०२६ रोजी त्या एकाच दिवशी घडून येणे हा कित्येक वर्षांमधून एकदाच मिळणारा एक अत्यंत अद्भुत योग आहे.
येत्या बुधवारी सूर्योदयाच्या सुमारे ३० ते ६० मिनिटे आधी आकाशात बुध, मंगळ, गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे सहा ग्रह एका रांगेत पसरलेले दिसतील. यापैकी मंगळ, गुरू आणि शनी हे कोणत्याही उपकरणाशिवाय उघड्या डोळ्यांनी पाहता येतील, तर युरेनस आणि नेपच्यून पाहण्यासाठी दुर्बीण (बाईनॉक्युलर्स) किंवा टेलिस्कोपची गरज भासेल.
याच दिवशी दिवसाच्या वेळी मोठे पूर्ण सूर्यग्रहण पाहायला मिळेल. १९९९ नंतर युरोपच्या मुख्य भूप्रदेशातून दिसणारे हे पहिलेच पूर्ण सूर्यग्रहण असेल. हे ग्रहण ग्रीनलँड, आईसलँड, उत्तर स्पेन व पोर्तुगालच्या काही भागांतून दिसेल. आईसलँडजवळील समुद्रात हे ग्रहण सर्वात जास्त काळ (सुमारे २ मिनिटे १८ सेकंद) राहील. तर युरोपच्या उर्वरित भागांत, कॅनडा व उत्तर अमेरिकेत खंडग्रास (अंशिक) सूर्यग्रहण असेल. प्रमाणित चष्म्याच्या (आयएसओ १२३१२-२) वापराशिवाय सूर्यग्रहण थेट पाहिल्यास डोळ्यांचे कायमचे नुकसान होऊ शकते, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.
अंधार पडल्यानंतर पर्सिड उल्कावर्षाव त्याच्या शिखरावर असेल. या दिवशी सूर्यग्रहण असल्यामुळे अमावास्या असेल. त्यामुळे रात्री चंद्राचा प्रकाश नसेल आणि आकाश पूर्णपणे अंधारे राहील. यामुळे दर तासाला १०० पर्यंत चमकणाऱ्या उल्का आकाशात स्पष्टपणे वाहताना दिसू शकतात.