Nirmala Sitharaman : सीतारामन यांचा आज सलग ७ वा अर्थसंकल्प
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि.२३) आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सलग सातवा अर्थसंकल्प सादर करतील. माजी केंद्रीय अर्थमंत्री मोरारजी देसाई (हे पुढे पंतप्रधानही बनले होते) यांचा विक्रम मागे टाकून एक नवा इतिहास त्या रचणार आहेत.
सीतारामन या पुढच्या महिन्यात ६५ वर्षांच्या होतील. २०१९ मध्ये दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पहिल्या पूर्ण-वेळ महिला अर्थमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केल्यापासून, सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्पासह सलग ६ वेळा अर्थसंकल्प सादर केले आहेत. मंगळवारी त्या सादर करणार असलेला अर्थसंकल्प हा त्यांचा सलग सातवा अर्थसंकल्प असेल. यापूर्वी १९५९ ते १९६४ या कालावधीत सलग ५ अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याचा तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांचा विक्रम त्या मोडतील.

