

पुढारी ऑनलाईन डेस्क : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPM) सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे आज (दि.१२) दीर्घ आजाराने दिल्लीत निधन झाले. श्वसन संसर्ग झाल्याने मागील काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. विद्यार्थी नेते ते आघाडीच्या राजकारणातील 'चाणक्य' अशी ओळख निर्माण केलेल्या येचुरी यांचा देशात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विस्तारात सिंहाचा वाटा होता. डाव्यांमधील उदारमतवादी नेते, अशीही त्यांची ओळख होती. जाणून घेवूया त्यांच्या पाच दशकांच्या राजकीय प्रवासाविषयी...
सीताराम येचुरी यांचा जन्म १२ ऑगस्ट १९५२ रोजी तामिळनाडूतील तेव्हाचे मद्रास (आताचे चेन्नई ) येथील ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील सर्वेश्वर सोमयाजुला येचुरी हे आंध्र प्रदेश राज्य मार्ग महामंडळात अभियंता होते. विशेष म्हणजे त्यांच्या आई कल्पकम येचुरी सरकारी अधिकारी होत्या.
सीताराम येचुरी यांचे बालपण हैदराबादमध्ये गेले. येथील ऑल सेंट्स हायस्कूलमधून त्यांनी मॅट्रिक केली. तेलंगण आंदोलनानंतर ते दिल्लीत आले. येथील प्रेसिडेंट इस्टेट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. येचुरी हे १९७० मध्ये CBSE बारावीच्या परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर प्रथम आले होते. यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या ख्यातनाम सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या कॉलेजमधून त्यांनी प्रथम क्रमांकाने अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (JNU) अर्थशास्त्र विषयात एमए पदवी संपादन केली. जेएनयूमध्ये त्यांनी पीएचडीसाठी प्रवेशही घेतला होता. मात्र 1975 मध्ये आणीबाणीच्या काळात अटक झाल्यामुळे ते पीएचडी पूर्ण करु शकले नाहीत.
विद्यार्थीदेशतच सीताराम येचुरी यांच्यावर डाव्या विचारांचा प्रभाव होता. १९७४ मध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) च्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. यानंतर त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. आणीबाणीच्या काळात त्यांना अटक झाली होती. १९७७ मध्ये तुरुंगातून सुटका झाल्यानंतर सीताराम येचुरी यांची वर्षभरात तीनदा JNU विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. सीताराम येचुरी आणि माकपचे माजी सरचिटणीस प्रकाश करात यांनी जेएनयूला डाव्यांचा बालेकिल्ला बनवले. येचुरी यांची SFI चे सरचिटणीस म्हणून निवड झाली. 1978 मध्ये त्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९८४ मध्ये येचुरी सीपीआय-एमच्या केंद्रीय समितीचे सदस्य झाले. १९९२ मध्ये सीपीआय-एमच्या पॉलिटब्युरोमध्ये सीताराम येचुरी निवडून आले.
सीताराम येचुरी 2005 मध्ये पश्चिम बंगालमधून राज्यसभेचे सदस्य झाले. 18 ऑगस्ट 2017 पर्यंत राज्यसभा सदस्य हाेते. या काळात त्यांनी लोकहिताचे अनेक मुद्दे संसदेत मांडले.संसदेच्या वरिष्ठ सभागृहात येचुरी आपल्या प्रभावी बोलण्याच्या क्षमतेने आणि वास्तवदर्शी भाषण शैलीने विरोधकांनाही आवाक करत असत. 19 एप्रिल 2015 रोजी त्यांची पक्षाचे पाचवे सरचिटणीस म्हणून निवड झाली. येचुरी यांनी सलग तीन वेळा (२००५-१५) पक्षाचे सरचिटणीस राहिलेल्या प्रकाश करात यांच्याकडून पक्षाची सूत्रे हाती घेतली.18 एप्रिल 2018 रोजी सीताराम युचुरी पुन्हा एकदा माकपचे सरचिटणीस बनले होते.