

नवी दिल्ली; पीटीआय : वस्तू आणि सेवा करातील (जीएसटी) कपातीचा द़ृश्य परिणाम ऑक्टोबर महिन्यातील वस्तूंच्या किमतीवर दिसेल. त्यामुळे किरकोळ महागाई निर्देशांक अर्धा टक्क्याच्या खाली येईल, असा अंदाज युनियन बँक ऑफ इंडियाच्या ताज्या अहवालात वर्तविण्यात आला आहे.
ऑक्टोबर महिन्यात खाद्यान्नाच्या किमतीत चांगली घट पाहायला मिळत आहे. आजच्या तारखेअखेरीस महागाई निर्देशांक अर्धा टक्क्याच्या खाली आहे. येत्या हिवाळी हंगामात खाद्यान्नाच्या किमती उणे पातळीवर जातील, असे अहवालात म्हटले आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये महागाई निर्देशांक 3.1 वरून 2.6 टक्क्यांवर येईल. सप्टेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा किमती खाली आल्या आहेत. ग्राहक खाद्यान्न किंमत निर्देशांक उणे 2.28 टक्क्यांवर आला आहे. जून 2025 पासून खाद्यान्न महागाई निर्देशांक उणे पातळीवर आहे.
ग्रामीण भागातील महागाई निर्देशांक 1.07 टक्के आणि शहरी भागातील निर्देशांक 2.04 टक्क्यांवर आला आहे. शहरी भागातील खाद्यान्न महागाई निर्देशांक उणे 2.47 आणि ग्रामीण भागातील निर्देशांक उणे 2.17 टक्क्यांवर आला आहे. भाजीपाला आणि खाद्यतेलाच्या किमतीत घट झाल्याने खाद्यान्न महागाई निर्देशांकात घसरण दिसून येत आहे. तसेच फळे, तृणधान्ये, डाळी, अंडी, इंधन आणि वीज यासारख्या प्रमुख श्रेणींमध्ये घट झाल्यामुळे महागाई निर्देशांक खाली येण्यास मदत झाली आहे.