

नवी दिल्ली : प्रमोशनल व्हॉईस कॉल्सबाबत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या तरतुदीमुळे स्पॅम कॉल्स आणि नको असलेल्या संदेशांच्या संख्येमध्ये मोठी घट झाली आहे. कठोर कायदे लागू केल्यानंतर ग्राहकांना स्पॅम किंवा नको असलेल्या कॉलपासून दिलासा मिळाल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) बुधवारी ही माहिती दिली आहे.
ट्रायने सांगितले की, स्पॅम कॉल आणि संदेशांच्या समस्येला तोंड देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. प्रमोशनल व्हॉईस कॉलच्या नियमांचे उल्लंघन करताना आढळलेल्या कोणत्याही संस्थेची सर्व दूरसंचार संसाधने बंद केली जातील. अशा कंपन्यांना दोन वर्षांसाठी काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकले जाईल. एवढेच नाही तर त्यांच्यासाठी नवीन संसाधनांचे वाटपही या काळात थांबवले जाईल. केंद्र सरकारच्या या कठोर नियमानंतर स्पॅम कॉलच्या तक्रारींमध्ये मोठी घट दिसून आली.
या वर्षी ऑगस्ट महिन्यात स्पॅम कॉलच्या विरोधात नोंदवलेल्या तक्रारींची संख्या १ लाख ८९ हजार होती, जी सप्टेंबर २०२४ मध्ये कमी होऊन १ लाख ६३ लाख झाली. गेल्या तीन महिन्यांत किमान १८ लाख क्रमांक ब्लॉक करण्यात आले असून ८०० हून अधिक कंपन्यांना काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्यात आल्याचा दावा ट्रायने केला आहे. ट्रायने हे अनिवार्य केले आहे की सर्व व्यावसायिक कॉल १४० मालिका क्रमांकावरून केले जातील. ज्या लोकांनी डू नॉट डायल (डीएनडी) साठी नोंदणी केली आहे त्यांना व्यावसायिक कॉल जाणार नाहीत. वैयक्तिक नंबरवरून स्पॅम कॉल किंवा संदेश पाठवणाऱ्या कोणत्याही टेलि-मार्केटरला ते नंबर ब्लॉक केले जातील.