

बंगळूर : चिन्नास्मावी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीची न्यायदंडाधिकार्यांमार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी दिली. मुख्यमंत्र्यांंनी बुधवारी सायंकाळी चेंगराचेंगरीत जखमी झालेल्यांची उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि गृहमंत्री जी. परमेश्वर यांच्यासमवेत रुग्णालयात भेट घेतली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, या घटनेचे अतिव दुःख आहे. सुरक्षेतील त्रुटींसह सर्व मुद्द्यांची जिल्हा न्यादंडाधिकार्यांच्या नेतृत्वाखाली चौकशी केली जाईल. 15 दिवसांत अहवाल प्राप्त होईल, त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल. या घटनेचे राजकारण करू नये. स्टेडियमवर आयोजित विजयोत्सव सरकारी नव्हता. त्यामुळे दुर्घटनेशी सरकारचा संबंध नाही. चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 47 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 33 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या उपचारांचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये भरपाई दिली जाईल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
राज्य सरकारच्या वतीने विधानसौधसमोर आयपीएल चषक जिंकणार्या खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यात एक लाखाहून अधिक लोकांनी सहभाग घेतला. यामध्ये कोणताही गोंधळ किंवा गैरप्रकार न होता कार्यक्रम सुरळीत पार पडला. कर्नाटक क्रिकेट बोर्डाने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजयोत्सव साजरा केला होता. हा सरकारी कार्यक्रम नव्हता. राज्य सरकारला त्याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती नव्हती. स्टेडियममध्ये 35 हजार लोक बसू शकतील अशी क्षमता आहे. मात्र दोन ते तीन लाख लोक एकाच वेळी गर्दी करत असल्याने ही घटना घडली. हा राज्य सरकारने आयोजित केलेला कार्यक्रम नाही. विजयोत्सव साजरा करण्यासाठी क्रिकेट बोर्डाने परवानगी मागितली होती. राज्य सरकारने परवानगी दिली होती. मात्र आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. अशी घटना घडेल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती, असेही मुख्यमंत्री म्हणाले. स्टेडियममध्ये शक्य तितकी सुरक्षा पुरवण्यात आली होती. क्रिकेट संघटनेच्या प्रशासकीय मंडळाने किती लोक उपस्थित राहतील, ही माहिती दिली नव्हती. म्हणूनच ही दुर्घटना घडली. ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पूर्णचंद्र (वय 26 रा. रायसंद्र के. आर. पेठे), दिव्यांशी (वय 14), डिंपल (वय 8), भूमिक ( वय 20), सहना (वय 19), श्रवण (वय 21), दिया (वय 26), चिन्मय (वय 19) अशी 11 पैकी 8 जणांची नावे आहेत.