

जयंत निमगडे
गडचिरोली : देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी 31 मार्चपर्यंत देशातील नक्षल चळवळीचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार केल्यानंतर माओवादी चळवळीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. आता देशभरात उरलेल्या माओवाद्यांच्या केवळ दोन पॉलिट ब्युरो सदस्यांना पकडण्यासाठी पोलिसांकडे अवघे सहा दिवस शिल्लक राहिले आहेत.
2004 मध्ये पीपल्स वॉर ग्रुप आणि माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर यांचे विलीनीकरण होऊन भारतीय कम्युनिस्ट पार्टीची (माओवादी) स्थापना करण्यात आली. ‘महासचिव’ हे या पक्षाचे सर्वोच्च पद असून, पॉलिट ब्युरोमध्ये अंतिम निर्णय घेतले जातात. पक्षाच्या स्थापनेपासून मुप्पाला लक्ष्मण राव ऊर्फ गणपती याने सुमारे 14 वर्षे महासचिव पद सांभाळले. गणपतीच्या कार्यकाळात देशात माओवादी चळवळ एवढी फोफावली की, तिने सरकारला जर्जर करून सोडले. त्यामुळे 2013 मध्ये देशातील 76 जिल्ह्यांमध्ये माओवादी चळवळीचा प्रभाव असल्याचे अधिकृतरित्या केंद्र सरकारला जाहीर करावे लागले होते.
पुढे प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून 2018 मध्ये गणपतीने पद सोडले. त्यानंतर नंबाला केशव राव ऊर्फ बसवा राजू नवा महासचिव झाला. परंतु 21 मे 2025 रोजी छत्तीसगडमधील करेगुट्टाच्या पहाडीवर पोलिसांनी बसवा राजूला कंठस्नान घातले. तेव्हापासून त्रिस्तरीय सुरक्षेचा घेरा असलेल्या आपल्या सर्वोच्च नेत्यापर्यंत पोलिस पोहचू शकतात, तर आपले काय होईल, या भीतीने अनेक मोठ्या नेत्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग अवलंबिला. त्यात दुसर्या क्रमांकाचा नेता मल्लोजुल्ला वेणुगोपाल उर्फ भूपती ऊर्फ सोनू, महासचिव झालेला थिप्परी तिरुपती, मल्लाराजी रेड्डी, बालन्ना आदींनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. डिसेंबर 2025 मध्ये ओडिशातील केंद्रीय समिती सदस्य गणेश उईके यास पोलिसांनी कंठस्नान घातलं.
2005 पासून 2023 पर्यंत सुशील रॉय, बी. नारायण सन्याल, प्रमोद मिश्रा, अमिताभ बागची, कोबाड घांदी, बच्चा प्रसाद सिंग, चेरीकुरी राजकुमार ऊर्फ आझाद, जगदीश यादव, बी. सुधाकर, कटकम सुदर्शन, आशुतोष, अनुज ठाकूर, प्रशांत बोस, मल्लोजुला कोटेश्वर राव ऊर्फ किशनजी असे अनेक सदस्य माओवादी कम्युनिस्ट पक्षाने गमावले. यापैकी कुणाला अटक झाली, कुणी चकमकीत ठार झाले, कुणी आत्मसमर्पण केलं तर कुणाचा आजारामुळे मृत्यू झाला. काही महिन्यांपूर्वीच कमांडर हिडमा ठार झाला. मागील वर्षी भूपती आणि यंदा देवजी या दोन पॉलिट ब्युरो सदस्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग निवडला. सोमवारी दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य पापा राव याने 17 सहकार्यांसह शरणागती पत्करली.
आता मुप्पाला लक्ष्मण राव ऊर्फ गणपती व मिशिर बेसरा हे दोनच पॉलिट ब्युरो सदस्य उरले आहेत. त्यातील गणपती हा वार्धक्यामुळे निष्क्रिय आहे. त्याने नेपाळमध्ये आश्रय घेतल्याची कुणकुण लागताच अलीकडेच पोलिस तेथे जाऊन आले. परंतु गणपती सापडला नाही. गणपतीवर सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे बक्षीस आहे. मिशिर बेसरा हा झारखंडचा रहिवासी असून, झारखंड, बिहार आणि ओडिशात तो सक्रिय आहे. त्याच्यावर जवळपास दीड कोटी रुपयांचे बक्षीस आहे. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 31 मार्च 2026 पर्यंत देशातून माओवादाचे समूळ उच्चाटन करण्याच्या निर्धाराला 6 दिवस शिल्लक असताना गणपती आणि मिशिर बेसरा हे आत्मसमर्पण करणार, त्यांना अटक होईल की चकमकीत ते मारले जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुरक्षा दलांच्या वाढत्या दबावामुळे नक्षलवाद्यांचे नेतृत्व संपले असून, उरलेले दोन नेतेही आता एकाकी पडले आहेत. 31 मार्चपर्यंत नक्षलमुक्त भारताचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने ही अत्यंत महत्त्वाची पावले मानली जात आहेत.