

नवी दिल्ली : 'जय भवानी, जय शिवाजी'चा गगनभेदी जयघोषात, ढोल-ताशांचा गजरात, तुतारींच्या निनादात आणि शाहिरी पोवाड्यांच्या गजरात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राजधानी दिल्लीत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय सेनेच्या तुकडीने छत्रपती शिवाजी महाराजांना विशेष मानवंदना दिली. नाशिकचे शिवराय ढोल पथक, लेझीम पथक, वारकरी दिंडी आणि झेंडा पथकासह महाराष्ट्र सदन परिसरात भव्य 'शोभायात्रा' काढण्यात आली. या कार्यक्रमाला राजधानी दिल्लीसह हरियाणा, उत्तर प्रदेशातील विविध भागांतून आलेले नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनात शिवजयंती राष्ट्रोत्सव समितीतर्फे दिल्लीस्थित नवीन महाराष्ट्र सदनात या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांच्यासह सांगलीचे खासदार विशाल पाटील, निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला, निवास आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड, माहिती संचालक हेमराज बागुल प्रामुख्याने उपस्थित होते. अतिथींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आणि पाळणा पूजन करून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाला सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, व्यवस्थापक प्रमोद कोलपते, मुख्य सुरक्षा अधिकारी अनिल चोरगे, शिवजयंती राष्ट्रोत्सव समितीचे प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.
आठ वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राष्ट्रीय पातळीवर व्यापक स्वरूपात साजरी व्हावी, यासाठी आमचा प्रयत्न होता. त्यानुसार या कार्यक्रमाची सुरुवात झाली. पहिल्या वर्षी देशाचे राष्ट्रपती या कार्यक्रमाला आले होते. त्यांच्यासह नौदल प्रमुख, लष्कर प्रमुख कार्यक्रमाला उपस्थित होते. दरवर्षी अधिकाधिक लोक या कार्यक्रमात अगदी उत्साहात आणि आनंदाने सहभागी होतात. दिल्लीतील तमाम मराठीजन आणि शिवप्रेमी येथे मोठ्या संख्येने एकत्र येतात. हा सोहळा आता लोकोत्सव झाला आहे. शिवाजी महाराज आपली अस्मिता आहे आणि त्यांची जयंती हा आपल्या सर्वांसाठी आनंदाचा सोहळा आहे.
- संभाजीराजे छत्रपती
शिवजयंती राष्ट्रोत्सव समितीने तयार केलेल्या शिवकालीन दिनदर्शिकेचे प्रकाशन संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून त्यांच्या सबंध जीवनात घडलेल्या ऐतिहासिक घटनांचा तारखेनुसार सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित छायाचित्रे देखील यात आहेत.