

नवी दिल्ली : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अभिवादन केले.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत. तर राहुल गांधी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरपूर्वक वंदन करतो. त्यांच्या धैर्याने आणि शौर्याने त्यांनी आम्हाला निर्भयतेने आणि पूर्ण समर्पणाने आपला आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणास्रोत राहील, असे राहुल गांधी म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना राहुल गांधींनी एक विशेष फोटो शेअर केला. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर होते, यावेळी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भेट देण्यात आला होता. राहुल गांधींनी तो पुतळा उंचावर घेऊन समोरील सर्व उपस्थितांना दाखवला होता. तेव्हाही त्या फोटोची चर्चा झाली होती. शिवजयंती निमित्त राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा तो फोटो शेअर केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सोशल मीडियावर लिहिताना इंग्रजीत 'होमेज' या शब्दाचा उपयोग केला तर राहुल गांधींनी 'श्रद्धांजली' शब्द वापरला. दोन्ही शब्दांवरून भाजप, काँग्रेससह राजकीय वर्तुळात टीकाटिप्पणी झाल्याचे पाहायला मिळाले.