

ठाणे : आंतरराष्ट्रीय शिर्डी विमानतळाची नवीन एकात्मिक टर्मिनल इमारती तसेच छत्रपती संभाजीनगर विमानतळाचे भूसंपादन आणि प्रादेशिक जोडणी योजना (आरसीएस) राज्यातील विमानतळांना लागणार्या विविध सोयी-सुविधांसाठी 2025- 2026 या वर्षांमध्ये तरतूद केलेल्या 423 कोटींपैकी 253 कोटी 8 लाख 24 हजारांचा निधी राज्य सरकारने आज महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडे वर्ग केला आहे. यामध्ये शिर्डीला 136 कोटी आणि संभाजीनगर विमानतळासाठी 87 कोटी निधीचा समावेश आहे. इतर विमानतळांसाठी 30 कोटी रुपये आहेत.
शिर्डी विमानतळ हे मुंबई, पुणे आणि नागपूरच्या विमानतळांनंतर महाराष्ट्रातील चौथे सर्वात व्यस्त विमानतळ आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील काकडी येथील शिर्डी विमानतळावरून पहिले उड्डाण 1 ऑक्टोबर 2017 मध्ये झाले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडच्या मालकीचे हे शिर्डी विमानतळ भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे चालवले जाते. शिर्डीमध्ये रस्ते वाहतुकीने दररोज 60 हजार भाविक हे साईबाबांच्या दर्शनासाठी ये-जा करीत असतात. त्यामुळे आता विमानसेवाचा फायदा भाविकांना होत आहे.
कुंभमेळ्यापूर्वी सुरू करणार शिर्डी विमानतळ
नाशिक कुंभमेळ्यापूर्वी हे विमानतळ सुरू करण्याचा मानस आहे. त्याअनुषंगाने कामांना वेग आला आहे. त्यामुळे या विमानतळाचे दुसरे नवीन एकात्मिक टर्मिनल इमारती उभारण्याची कामे, अॅप्रॉन विस्तारीकरणाची उर्वरित कामे, सिटी साईड इमारतीचे व एटीसी टॉवरच्या उभारणीची कामे याकारिता 136 कोटी रुपये महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला देण्यात आले आहेत. आतापर्यंत या विमानतळासाठी 455 कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे.