नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शेख जानी बाशा ऊर्फ जानी मास्टर याला सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनाबद्दल यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला होता, मात्र त्याच्यावर त्याच्याच महिला असिस्टंटने तो तिच्यावर ती अल्पवयीन असतानापासून बलात्कार करत आलेला आहे, असा गुन्हा दाखल केल्याचे समोर आल्याने त्याचा पुरस्कार रद्द करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शेख जानी सध्या अटकेत आहे आणि पुरस्कार समारंभाला हजेरीसाठी जामीन मिळावा म्हणून त्याने न्यायालयात अर्जही केलेला होता. 6 ते 10 ऑक्टोबरपर्यंत तो मंजूरही झाला, पण आयोजक केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानेच शेख जानीच्या पुरस्कार समारंभातील उपस्थितीवरही बंदी घातली आहे.
प्रकरण काय?
21 वर्षांच्या सहायक नृत्यदिग्दर्शिकेने चालू वर्षात सप्टेंबरमध्ये शेख जानीवर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता.
19 सप्टेंबर रोजी सायबराबाद पोलिसांनी जानीला गोव्यातून अटक केली. चौकशीत जानीने गुन्ह्याची कबुली दिली होती.
2019 मध्ये एका कार्यक्रमादरम्यान पीडित तरुणी पहिल्यांदा जानीला भेटली होती.
2020 मध्ये जानीने मुंबईतील एका हॉटेलमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यावेळी पीडितेचे वय 16 होते. पुढे जानीने तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणला.
2022 मध्ये रीलिज झालेल्या धनुषच्या ‘तिरुचित्रंबलम’ चित्रपटातील मेघम करुकथा या गाण्याच्या नृत्यदिग्दर्शनासाठी शेख जानीला हा पुरस्कार मिळाला होता. शेख जानीने ‘स्त्री 2’ आणि ‘पुष्पा’ या बहुचर्चित चित्रपटांतील गाण्यांसाठीही नृत्यदिग्दर्शन केलेले आहे.