

नवी दिली : पुढारी वृत्तसेवा-राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध सेंट कोलंबस शाळेत शिकणाऱ्या शौर्य पाटील नामक मराठी विद्यार्थ्याने मंगळवारी आत्महत्या केली. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी संतप्त पालक आणि नागरिकांनी निदर्शने केली. दिल्लीतील अनेक सामाजिक संस्था, संघटना देखील यामध्ये सहभागी झाल्या होत्या. काही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी देखील यावेळी सहभागी झाले होते. दरम्यान, शौर्य पाटीलच्या मृत्यूला ३ दिवस उलटून गेल्यानंतरही शाळेने शौर्यला श्रद्धांजली अर्पण केली नाही किंवा त्याच्या निधनावर दुःखही व्यक्त केले नाही.
दरम्यान, शनिवारी शौर्य पाटीलला श्रद्धांजली देण्यासाठी महाराष्ट्र सदन ते इंडिया गेटवर कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे. शौर्य पाटील नामक मराठी विद्यार्थ्याने शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे दोन पानी सुसाइड नोटमध्ये लिहीले आहे. या पार्श्वभुमीवर शाळेतील शिक्षकांच्या आणि शाळा प्रशासनाच्या विरोधात संतप्त पालकांनी सलग दुसऱ्या दिवशी शांततापुर्ण मार्गाने निदर्शने केली. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे आई - वडील, नातेवाईक, स्थानिक नागरिक, दिल्लीतील मराठीजन सहभागी झाले होते.शौर्यला न्याय द्या, दोषी शिक्षकांवर कारवाई करा, त्यांना अटक करा, शाळेची मान्यता रद्द करा, अशा प्रकारचे फलक पालकांच्या हातात होते. शाळेसमोर मेणबत्त्या लावण्यात आल्या होत्या.
आमची नावे लिहू नका, आमचे चेहरे दाखवू नका
दुसऱ्या दिवशी झालेल्या निदर्शनांमध्ये शालेय विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. शौर्याला न्याय मिळालाच पाहिजे. अशा घोषणाही विद्यार्थ्यांनी दिल्या. शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी पालकांना बोलवा असे सांगतात. काही कारण नसताना चुकीची वागणूक देतात, असेही विद्यार्थी म्हणाले. मात्र माध्यमांशी संवाद साधताना आमची नावे लिहू नका आणि आमचे चेहरे टीव्हीवर दाखवू नका नाही तर आमच्यावर कारवाई होईल, अशी भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे आपल्या शाळेतील मुलाला न्याय मिळावा म्हणून विद्यार्थी स्वतःहून सहभागी झाले होते.
शाळेतील मुलांवर प्रशासनाची देखरेख?
दुसऱ्या दिवशी शाळेसमोर निदर्शनांमध्ये काही विद्यार्थीही सहभागी झाले होते. मात्र विद्यार्थ्यांनी स्वतःचे चेहरे लपवले होते. शाळेतील काही लोक आमच्यावर देखरेख ठेवून असतील. आम्ही दिसलो तर आमचे गुण कमी होतील, अशी शंकावजा भीती त्यांनी व्यक्त केली.
पालकांच्याही मनात भीती
सेंट कोलंबस शाळेला दुपारी १.४५ वाजता सुट्टी झाली. यावेळी काही पालक, विशेषतः मातापालक आपल्या मुलांना घ्यायल्या आल्या होत्या. शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणामुळे त्यांच्याही मनात भीतीचे वातावरण आहे एक पालक म्हणाले की, या घटनेनंतर मुलांना अभ्यासाला बसा असे सांगायला किंवा त्यांना थोडेसेही ओरडायला भीती वाटते. काही पालकांनी तर शाळा गरजेपेक्षा जास्त इतर उपक्रमांवर वेळ आणि पैसा खर्च करवते, असेही सांगितले.
ही तर हत्याच...
शौर्यच्या चालकाचा आरोपरामप्रसाद नामक वाहनचालक रोज शौर्यला शाळेत सोडायला जायचे आणि घ्यायला यायचे. मंगळवारी मात्र रामप्रसाद येण्यापूर्वीच शौर्य शाळेतून निघाला होता. शुक्रवारी रामप्रसाद माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, शाळेतून येताना नेहमीच अस्वस्थ वाटत होता. मंगळवारी मला तो शाळेच्या प्रवेशद्वारावर भेटला नाही, थेट रुग्णालयातून फोन आल्यानंतरच कळले की काय घडले. शौर्यची आत्महत्या नसून शाळेने केलेली हत्याच आहे, असा आरोप त्यांनी केला. हे बोलत असताना त्यांना अश्रू अनावर झाले.
पालकांच्या धक्कादायक प्रतिक्रिया:
'पुढारी'शी बोलताना एक पालक म्हणाले की, छोट्या छोट्या कारणांवरून शाळेतील शिक्षक मुलांना आपल्या पालकांना घेऊन या, असे सांगतात. त्यांना किरकोळ गोष्टींसाठी चुकीची वागणूक देण्यात आली. केवळ शाळेत रांगेत निट उभा नाही राहिला म्हणून मला अनेक वेळा शाळेत बोलवण्यात आले. जेवणाच्या सुट्टीत चुकून पाणी सांडले म्हणुन पालकांना शाळेत बोलवले जाते, हे चुकीचे आहे. दरम्यान, शौर्यच्या आत्महत्येनंतर मुलांशी बोलताना आम्हाला भीती वाटते, विशेषतः आम्ही कामानिमित्त कार्यालयात असताना किंवा घराबाहेर असताना भीती वाटते, असेही ते म्हणाले. तर काही महिला पालकांनी आरोप केला की, शाळेत श्रीमंत कुटुंबातील मुले आणि सामान्य किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले यांच्यात उघड भेदभाव केला जातो. सर्वच विद्यार्थी समान शुल्क भरतात मात्र आमच्या मुलांकडे दुर्लक्ष केले जाते आणि श्रीमंत कुटुंबातील मुलांना विशेष सुविधा आणि लक्ष दिले जाते, असाही आरोप केला.
आतापर्यंत काय कारवाई झाली?
यापूर्वी पोलिसांनी अपराजिता पाल, मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस या शिक्षिकांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. शाळा प्रशासनाने संबंधित ४ शिक्षकांना निलंबित केले आहे. दिल्ली सरकारच्या वतीने एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणासंदर्भात खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहिले आहे. शौर्य पाटील या विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या शिक्षकांवर आणि शाळेवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली.
मंगळवारी काय घडले?
मूळचे सांगली जिल्ह्यातील असलेले प्रदीप पाटील व्यवसायानिमित्त दिल्लीत स्थायिक झाले आहेत. प्रदीप पाटील यांचा मुलगा शौर्य दिल्लीच्या गोल मार्केट परिसरातील सेंट कोलंबस शाळेत इयत्ता दहावीत शिकत होता. मंगळवारी तो शाळेतून निघाला आणि जवळच्या राजेंद्र नगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर शौर्यची सुसाइड नोट सापडली. त्यामध्ये शाळेच्या अपराजिता पाल, शिक्षिका मनू कालरा, युक्ती महाजन आणि जुली व्हर्गिस यांच्या अपमानास्पद वागणुकीमुळे आत्महत्या करत असल्याचे त्याने लिहीले आहे. 'माझ्यासारखी आत्महत्या करण्याची वेळ अन्य कोणत्याही विद्यार्थ्यांवर येऊ नये म्हणून चारही शिक्षिकांच्या विरोधात कडक कारवाई करावी हीच शेवटची इच्छा आहे', असेही शौर्यने सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे.