

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयात शौर्य पाटील आत्महत्येसंदर्भात सुनावणी पार पडली. दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना या प्रकरणात त्वरीत कारवाईसंबंधी स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी पुढील सुनावणी १२ मार्च रोजी होणार आहे.
दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत शिकणाऱ्या १६ वर्षांच्या शौर्य पाटील नामक विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर शौर्यचे वडील प्रदीप पाटील यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणी करत दिल्ली पोलिसांना नोटीस जारी केली. तसेच सुनावणी दरम्यान पोलिसांनी सांगितले की, त्यांनी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज घेतले आहेत. त्या फुटेजनुसार शाळेवर केलेल्या काही आरोपांची पुष्टी होत आहे.
दरम्यान, प्रदीप पाटील यांनी या याचिकेद्वारे मागणी केली की, या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांकडून केंद्रीय अन्वेषण संस्थेकडे (सीबीआय) हस्तांतरित करण्यात यावी, यावर न्यायालयानेही सीबीआयकडून प्रतिसाद मागवला आहे.
शौर्य पाटील नामक मराठी विद्यार्थ्याने शिक्षक आणि शाळेच्या मुख्याध्यापिकांकडून छळ झाल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहित आत्महत्या केली होती. आरोप केलेल्या शिक्षकांवर तक्रार दाखल करण्यात आली असली तरी कठोर कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर प्रदीप पाटील यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.