प्रसाद माळी : पुढारी ऑनलाईन
प्रेयसीसोबत पळून जाऊन लग्न करायचे असते, तेव्हा आठवतो जिवलग मित्र. पण तो जिवलग मित्र एखादा राजा असेल तर… मगं काय, तुमच्या लग्नाचा थाट काही औरच..! असेच काहीसे घडले होते मिरजेच्या मिशनरी रुग्णालयातील डॉ. विलियम वानलेस यांच्याबाबतीत आणि तो मित्र होता दस्तुरखुद्द राजर्षी छत्रपती शाहू महाराज…
५ डिसेंबर १९०७
वेळ साधारण सकाळची दहाची, सूर्याची किरणे चांगली वर यायला लागली होती. दवाखान्याजवळ नेहमीप्रमाणे लोकांची वर्दळ. एकेक करून रुग्णही यायला सुरू झाले होते. डॉक्टरांनी रुग्णांना तपासायला सुरुवात केली होती. तेवढ्यात दुरून घोड्यांच्या टापांचा आवाज यायला लागला. फक्त घोडेच नव्हते, तर एक मोठा रथ दवाखान्याच्या दिशेने दौडत येत होता. एक मोठा धिप्पाड रुबाबदार, भरजरी पोशाख घातलेला राजबिंडा माणूस रथ चालवत होता. दवाखान्याच्या दारात रथ येऊन थांबला. त्या रथाच्या सारथीने आपल्या धीरगंभीर आवाजात डॉक्टरांना हाक मारली. "डॉक्टर वानलेस… डॉक्टर वानलेस… बाहेर या". त्या मोठ्या रथातल्या रुबाबदार माणसाला पाहून सगळे लोक हबकले होते. दवाखान्याजवळची वर्दळ अचानक स्तब्ध झाली. डॉक्टरांना आवाज गेला.
शाहू महाराजांच्या बग्गीचे (कोच) छायाचित्र व हा कोच चालविणारे कोचमन
डॉक्टर म्हणाले, ' एवढ्या गंभीर आणि मोठ्या आवाजात मला कोण हाक मारतय'. आवाज ऐकून डॉक्टर तडक बाहेर आले. समोर पाहतात तर काय दस्तूरखुद्द शाहू महाराज, आपल्या आलिशान रथासह दारात उभे होते. नुसते उभे नाही तर रथाच्या घोड्यांची लगाम त्यांच्याच हातात होती. एरवी पेक्षा हे चित्र जरा वेगळंच होतं. डॉक्टर वानलेस यांनी असे शाहू महाराज कधी पाहिले नव्हते. शाहू महाराज डॉक्टरांना म्हणाले, "डॉक्टर फार पहात बसू नका, चला रथात बसा". आता शाहू महाराजांनीच ऑर्डर दिली म्हटल्यावर डॉक्टर काय करणार होते. ते गपचुप येऊन रथात बसले. शाहू महाराजांनी नर्स लिलियन हेवन्स यांना ही हाक मारली होती. नर्स लिलियन आल्या त्यांनाही रथामध्ये बसण्याचा आदेश मिळाला. डॉक्टर आणि नर्स दोघेही रथात बसले आणि शाहूमहाराजांनी घोड्याची लगाम कसली. रथ दौडला, घोड्यांच्या टापांचा आवाज दूरवर जाईपर्यंत येत होता. रथामुळे आजूबाजूला थोडासा धुरळा ही उडाला होता. हे सगळं पाहून लोक अचंबित झाले होते. नेमकं काय चाललंय काही कळायला मार्ग नव्हता. कुजबुजीचे रुपांतर आता चर्चेत होऊ लागले होते. दुसऱ्या संस्थानाचा राजा मिरजेत येतो काय आणि इथल्या डॉक्टर आणि नर्सला रथामध्ये बसवून घेऊन जातो काय? बर इतकच नव्हे तर रथही राजाच चालवतोय.
होय डॉ. वानलेस यांच्यासाठी त्यांचे प्रिय मित्र राजर्षी शाहू महाराजांनी रथाचं सारथ्य केलं होतं. जस महाभारतात अर्जुनासाठी श्रीकृष्णाने रथाचे सारथ्य केलं होतं तसं. आता हा नेमका प्रसंग काय होता. मित्र जरी असले तरी एक मोठ्या राजाने स्वतःकडे इतके नोकरचाकर असताना मित्रासाठी कशाला रथ चालवला असेल. शिवाय दुसऱ्या संस्थानातील म्हणजे मिरज संस्थानात मिशनरीचा दवाखान्यात सेवा बजावणाऱ्या डॉक्टरसाठी शाहू महाराजांनी हे कशासाठी केलं? यांच्यामध्ये इतकी घट्ट मैत्री कशी काय होती?
डॉ. वानलेस भारतात कसे आले?
कोल्हापुरात १८५२ पासूनच अमेरिकन मिशनरीच्या कार्यास सुरुवात झाली होती. कोल्हापुरातील मिशनरीच्या अंतर्गत सांगली येथे १८८४ साली उपकेंद्र काढण्यात आले. यानंतर या ठिकाणी गरीब, दीन दुबळ्या पीडित लोकांची सुश्रुशा करण्यासाठी दवाखाना काढण्याचा निर्णय झाला. १८८९ साली सांगलीत दवाखाना स्थापन करण्यात आला. याठिकाणी मूळचा कॅनडाचे रहवासी असणारा व नुकतीच वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झालेला नवखा तरुण डॉ. विलियम वानलेस आपली पत्नी मेरी वानलेस हिच्या सोबत सांगलीत दाखल झाला. प्रभू येशुच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे दीन दुबळ्याची सेवा करणे हीच ईश्वर सेवा मानून या दयाळू डॉक्टराने आपली सेवा बजावण्यास सुरुवात केली. पुढे डॉ. वानलेस यांनी आरोग्यदायी आणि पोषक वातावरण असलेल्या मिरजेची मुख्य दवाखान्यासाठी निवड केली. मिशनरीच्या रुग्णालयाची मुख्य इमारत त्यांनी इथे बांधली व मिरजेतच स्थायिक झाले.
डॉ. विलियम वानलेस
अल्पावधीच डॉ. वानलेस यांनी या क्षेत्रात आपले नाव कमावले. अर्थातच या नावाचा गवगवा कोल्हापूर पर्यंत झाला. डॉक्टरांची ख्याती शाहू महाराजापर्यंत पोहचली होती. तसेच कोल्हापूर संस्थानचे राजे शाहू महाराज यांची व त्यांच्या लोकहित कार्याची ओळख डॉ. वानलेस यांना होती. शाहू महाराज शिकारीसाठी नेहमी जत, विजापूरला जात असत. जाताना त्यांचा संपूर्ण ताफा मिरजेतूनच जात असे. अशावेळी हत्तीच्या अंबारीतबसून जाणाऱ्या रुबाबदार लोकराजाला डॉक्टरांनी अनेकदा पाहिलं होते.
पुढे हळूहळू राजांच्या घरातील महत्त्वाची माणसे आजरी पडली तर महाराज त्यांना डॉ. वानलेस यांच्याकडे उपचारासाठी पाठवत. तर कधी डॉक्टर स्वत: कोल्हापूरला तपासणीसाठी येत असत. पुढे डॉ. वानलेस हे शाहू महाराजांचे व त्यांच्या राजघराण्याचे फॅमिली डॉक्टरच बनले होते. या नात्याचे रुपांतर कधी जिवलग मैत्रीत झाले हे खुद्द त्यांचे त्यांनाच उमगले नाही. साधारण १९०३ पासून ते महाराजांच्या मृत्यू पर्यंत डॉ. वानलेस हे महाराजांचे फॅमिली डॉक्टर होते.
डॉ.वानलेस यांची पत्नी मेरी या परिचारीका होत्या. हे दाम्पत्य अगदी तन – मन लावून रुग्णांची सेवा बजावायचे. १९०६ साली अचानक कॉलराने मेरी वानलेस यांचा मृत्यू झाला. एकमेकांत आकंठ बुडलेल्या या दाम्पत्यांची दुर्दैवाने ताटातूट झाली. डॉ. वानलेस यांना धक्का बसला, ते फारच व्यथित झाले. शेवटी दु:ख विसरण्यासाठी त्यांनी स्वतःला कामात वाहून घेतले. अखेर जे व्हायचं तेच झालं, या कामाच्या ताणातून डॉ.वानलेस गंभीररित्या आजारी पडले. या बाबतची माहिती अमेरिकन मिशनरीला देण्यात आली. त्यांनी ताबडतोब डॉ. जॉन होम्स यांना मिरजेत पाठवले.
त्यासोबत मेरी वानलेस यांचे निधन झाल्याने येथे मुख्य परिचारिकेची कमतरता भासू लागली होती. त्यामुळे मिरजेतून कोल्हापूर मिशनरीकडे नर्स बाबत विचारणा करण्यात आली. कोल्हापूर मिशनरीत ६ महिन्यांपूर्वी नव्या परिचारिका लिलियन हेवन्स रुजू झाल्या होत्या. हेवन्स या अत्यंत हुशार आणि कुशल परिचारिका होत्या. या सोबत त्यांना गोड आवाज ही लाभला होता. अमेरिकेत असताना त्यांच लग्न झाल होत. पण, लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्या नवऱ्याचे निधन झालं. हे दु:ख विसरण्यासाठी आणि ईश्वराची सेवा करण्यासाठी ही तरुणी मिशनरीकडून कोल्हापुरात काम करण्यासाठी आली होती. कोल्हापूरच्या मिशनरीने मिरजेतील दवाखान्याची अवस्था पाहून त्वरित लिलियन यांची रवानगी मिरजेला केली.
डॉ. वानलेस खूपच आजारी होते. डॉ. होम्स यांनी दवाखान्याची जबाबदारी घेतली होती. सर्वांनाच डॉ. वानलेस यांची काळजी वाटू लागली होती. इकडे शाहू महाराजांपर्यंत डॉक्टरांची बातमी पोहचली होती. मेरी वानलेस यांचे जाणे आणि डॉक्टरांचे आजारी पडण्याने शाहू महाराज ही व्यथित झाले होते.
एकदा लिलियन मेडिकलच्या विद्यार्थ्यांना गाणे शिकवत होत्या. त्यांचा गोड आवाज डॉ. वानलेस यांच्या कानावर पडला. इतका गोड आणि मधूर आवाज ऐकल्यावर डॉ. वानलेस यांना या सुमधुर आवाजाने खेचून घेतले. त्यांनी लिलियन यांना गाताना पाहिलं आणि जणू त्यांना त्यांच्या आजाराचाच विसर पडला. पुढे लिलियन यांनी केलेल्या सुश्रूशामुळे डॉ. वानलेस लवकरच बरे झाले. त्यांनी पुन्हा रुग्णांच्या सेवेत स्वतःला वाहून घेतले. यावेळी त्यांच्या सोबतीला लिलियन होत्या. तिच्या साथीत त्यांना मेरीच्या दुःखाचा थोडासा विसर पडू लागला होता. अत्यंत हसरा चेहरा, सर्वांशी आदराने, प्रेमाने बोलणाऱ्या, गोड स्वभाच्या, सुंदर देहयष्टीच्या या तरुणीवर डॉक्टरांचा जीव जडला. हीच भावाना लिलियन यांची डॉक्टरांच्या प्रती होती. दोघेही तसे समदु:खी, दोघांनाही त्यांचा संसार अर्ध्यात सोडावा लागला होता. आता एकमेकांच्या साथीने त्यांना पुन्हा संसार सुरु करण्याची संधी आली होती. पण, अमेरिकन मिशनरीचा यास विरोध होता. त्यामुळे दोघांनाही आपल्या प्रेमाचा त्याग करावा लागणार होता. यामुळे दोघेही प्रेमी पुन्हा व्यथित झाले होते.
हा सर्व प्रकार छत्रपती शाहू महाराजांपर्यंत पोहचला होता. मेरी यांच्या निधनानतंर डॉ. वानलेस यांच्या जीवनात नव्या तरुणीच्या येण्यामुळे डॉक्टरांचे आयुष्य पुन्हा नव्याने उभे राहणार होते. पण, मिशनरीच्या विरोधामुळे शाहू महाराज ही चिंतित होते. या विचाराने त्यादिवशी शाहू महाराजांनी संपूर्ण रात्र जागवली. आपल्या मित्रासाठी आपण काहीच करु शकत नाही, याचे शल्य शाहू महाराजांच्या मनाला खावून टाकत होतं. मग सकाळी शाहू महाराज उठले त्यांनी आपला रथ सजवला आणि थेट पोहचले मिरजेला.
सोन्या – चांदीच्या अलंकारांनी, मखमली आणि जरीच्या वस्त्रांनी सजवलेले दोन रुबाबदार अरबी घोडे, त्यांना जोडलेला आलिशान रथ, मागे दरबारी पोशाखात उभारलेले दोन कोचमन आणि घोड्यांचा लगाम धरलेले शाहू महाराज थेट दवाखान्याच्या दारात उभे. डॉ. वानलेस आणि लिलियन हेवन्स यांना हा काय प्रकार आहे हे काहीच कळत नव्हतं. त्यांनी फक्त महाराजांचा आदेश पाळला आणि रथात बसले. संपूर्ण प्रवासात नेमक आपाल्या सोबत काय घडतय याचा विचार हे दोघे करत होते. मिरजेहून दौडवलेला रथ शाहू महाराजानी पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या कोडोलीला थांबवला.
कोडोलीच्या बाहेर असणाऱ्या चर्चा समोर रथ थांबला. येथे आधीपासूनच कोडोली मिशनचे प्रमुख डॉ. ग्रॅहाम स्वागतासाठी उभे होते. त्यांनी शाहू महाराजांसह डॉ. वानलेस आणि लिलियन यांना नमस्कार केला. चर्च अत्यंत सुंदर पद्धतीने सजवण्यात आले होते. महाराज व डॉ. ग्रॅहम यांनी वानलेस आणि लिलियन यांना चर्चमध्ये नेले आणि ख्रिश्चन परंपरेनुसार दोघांचे लग्न लावलं. महाराजांनी या लग्नाची तयारी आधीच करुन ठेवली होती. अचानक झालेलं आपलं लग्न आणि त्यासाठी शाहू महाराजांनी केलेला खटाटोप याचे आभार मानण्यासाठी नव दाम्पत्यांकडे शद्ब अपुरे पडत होते. सारं अगदी स्वप्नवत वाटाव असं घडलं होतं. हा हर्ष गगनात न मावेनासा झाला होता.
लग्न पार पडताच शाहू महाराजांनी त्याच रथातून नवदाम्पत्यांना कोल्हापुरातील आपल्या न्यू पॅलेसला आणले. तेथे त्यांची सरकारी पाहुणे म्हणून खास पाहुणचार केला. भारी कपडे आणि आभुषणे देऊन नवदाम्पत्यांना आहेर करण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी शाहू महाराज नवदाम्पत्यांना घेऊन मिरजेला आले. आता काय होतं, जे काही करायचं ते शाहू महाराजांनी केलं होतं. स्वत: महाराजांनीच हा विवाह घडवून आणल्याने मिशनरीनेही या लग्नास मान्यता दिली. सगळ्यांचा विरोध मावळला शाहू महराजांच्या आशीर्वादामुळे हे नवदाम्पत्य सुखाने संसारास लागले.
आता हे सारं वाचताना एखाद्या रोमँटिक चित्रपटाच्या कथे प्रमाणे वाटत आहे. ही रोमँटिक लवस्टोरी पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्या शाहू महाराजांनी बंडखोरी केली होती. त्यांनी आपल्या मित्राचा प्रेम विवाह घडवून आणला होता. हे एक खरा मित्र आपल्या मित्रासाठी करु शकतो. शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने लोकराजा होते. ते आपल्या रयतेचे सुख दु:ख जाणत होते. असा संवेदनशील, हळव्या आणि प्रेमळ मनाचा राजाच आपल्या मित्रासाठी असे कार्य करू शकतो.
मिरजेच्या मेडिकल हबची पायाभरणी
ही मैत्री इथेच थांबली नाही. मिरज मिशनच्या रुग्णालयासाठी शाहू महाराजांनी अनेक देणग्या दिल्या. आज मिरज मेडिकल हब बनले आहे. त्याचा पाया मिरज मिशन हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. वानलेस यांनी घातला होता. हे कार्य करत असताना डॉ वानलेस यांच्या पाठीशी शाहू महाराज सदैव खंबीरपणे उभे राहिले. या मैत्रीच्या जोडगोळीमुळेच मिरजेत आजचे मेडिकल विश्व उभे राहिले आहे.
डॉ. वानलेस यांनी दरबारी सर्जन होण्यास दिला नकार
महाराजांची इच्छा होती की डॉ. वानलेस यांनी कोल्हापुरात यावे. डॉक्टरांनी आपल्या दरबारी सर्जन व्हावे अशी इच्छा शाहू महाराजांनी व्यक्त केली होती. पण, या भल्या माणसाने अगदी शाहूमहाजांचा आदर ठेवत फक्त दीन दुबळ्यांची सेवा करता यावी यासाठी दरबारी सर्जन होण्याचे नाकारले. यावर शाहू महाराज नाराज झाले नाहीत. उलट त्यांना त्यांच्या मित्राचा आणखी अभिमान वाटू लागला. सर्व सुखे पायाशी लोळण घालत असताना ते नाकारणं आणि जनसेवा पत्करणं हे कुणी देवमाणूसच करू शकतो.
डॉ. वानलेस
मेरी वानलेस यांचं स्मारक
डॉ. वानलेस यांनी कोल्हापूरसाठी काहीतरी करावं असं सतत महाराजांना वाटत होतं. कोल्हापुरात ही चांगला दवाखाना सुरु करण्याची विनंती महाराजांनी डॉ. वानलेस यांना केली. यासाठी महाराजांनी कोल्हापुरातील कावळा नाका येथे असणारे मिलटरी हॉस्पिटल, तेथील बंगला व १३ एकरांची जागा डॉ. वानलेस यांना रुग्णालयासाठी दिली. शिवाय रुग्णालय उभारणीसाठी १३ हजारांची रक्कम ही दिली. तिथे रुग्णालयाची उभारणी झाली व त्यास शाहू महाराजांनी डॉक्टरांची दिवंगत पत्नी यांचे 'मेरी वानलेस' असे नाव दिले. अशा पद्धतीने शाहू महाराजांनी आपल्या मित्राच्या पहिल्या पत्नीच्या नावे एक स्मारकच बनवले. आज ही 'मेरी वानलेस' रुग्णालय शाहू महाराज आणि डॉ. वानलेस यांच्या मैत्रीची आठवण करुन देतो आहे.
डॉ. वानलेस काही कोल्हापूरला आले नाहीत. पण मित्राची पाठ सोडतील ते शाहू महाराज कसले. डॉक्टरांकडून उपचार करुन घेण्यासाठी शाहू महाराज मिरजेला जात राहिले. तिथे गेल्यावर राहता यावे म्हणून त्यांनी मिशन हॉस्पीटल जवळच मिरज संस्थानकडून जागा घेतली आणि तिथे राहण्यासाठी बंगला बांधला. फक्त डॉक्टरांकडे जाता यावे, त्यांचा सहवास लाभावा यासाठीच महाराजांनी हे केले. पुढे तो बंगलाही शाहू महाराजांनी डॉ. वानलेस यांनाच दिला. आज ही मिरजेत वंटमुरे कॉर्नरला शाहू महाराजांचा हा बंगला या इतिहासाची साक्ष देत आहे.
शाहू महाराजांचा मिरजेतील बंगला
ही ऐतिहासिक अशी मैत्री क्वचित आजच्या जगात किंवा इतिहासात पहाण्यास मिळेल. शाहू महाराज आणि डॉ. विलियम वानलेस यांनी आपल्या मैत्रीतूनही मिरज आणि कोल्हापूरच्या जनतेची एक प्रकारे सेवाच केली. कालाथित लोकराजा राजर्षी शाहू महाराज आणि त्यांचे मित्र सेवाव्रती डॉ. विलियम वानलेस यांना लोक कधीच विसरणार नाहीत. ही मैत्री अनेकांना प्रेरणा देत राहील आणि नवी पिढी घडवत राहिल.
(छायाचित्रे 'राजर्षी शाहू छत्रपती रयतेच्या राजाचे चित्रमय चरित्र' या इंद्रजित सावंत, देविकाराणी पाटील यांच्या पुस्तकातून साभार)