IndiGo Flight Blast : चंदिगढ विमानतळावर लँडिंगदरम्यान विमानात स्फोट; 5 प्रवासी जखमी

AI Image
AI Image
Published on
Updated on

चंदिगढ : गोवा आणि हैदराबादमार्गे चंदिगढला येणाऱ्या इंडिगोच्या विमानात लँडिंगच्या वेळी मोबाइल पॉवर बँकचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. ३) घडली. मोहाली येथील शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरत असतानाच ही दुर्घटना घडली असून, यामध्ये पाच प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेमुळे विमानात काही काळ प्रचंड गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

पॉवर बँकमुळे लागली आग

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोचे विमान (फ्लाईट क्रमांक 6E108) दुपारी ३ वाजून ३२ मिनिटांनी धावपट्टीवर उतरले. विमान थांबण्याच्या काही मिनिटे आधी, म्हणजेच ३ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास ३९-एफ या सीटवर बसलेल्या देवांश नावाच्या प्रवाशाच्या पॉवर बँकने अचानक पेट घेतला. प्रवाशाने तत्काळ याची कल्पना केबिन क्रू सदस्यांना दिली, मात्र अवघ्या काही सेकंदातच पॉवर बँकचा जोरदार स्फोट झाला. या स्फोटामुळे केबिनमध्ये धूर पसरला आणि आग लागली. विमान कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत तातडीने अग्निशमन उपकरणांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले.

आणीबाणीच्या दरवाजातून बाहेर पडताना चेंगराचेंगरी

स्फोटामुळे विमानात बसलेल्या प्रवाशांमध्ये घबराट पसरली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिक आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने आणीबाणीचे द्वार (इमर्जन्सी एक्झिट) उघडले. विमानतळावर सुरक्षितपणे उतरण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू झाली. या गडबडीत झालेल्या चेंगराचेंगरीत एक महिला प्रवासी गंभीररीत्या जखमी झाली आहे. तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून तिला तातडीने झिरकपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधित महिलेवर सध्या शस्त्रक्रिया सुरू असल्याचे समजते.

पाच प्रवासी जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

या संपूर्ण दुर्घटनेत एकूण पाच प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर झिरकपूर येथील एम केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने, आग वेळीच विझवण्यात यश आल्याने मोठी जीवितहानी टळली. लँडिंगच्या वेळी झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे विमानतळ प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली होती.

विमानतळ सुरक्षा यंत्रणा आणि इंडिगो एअरलाइन्सकडून या प्रकरणाची अधिक चौकशी केली जात असून, प्रवाशांना विमानात इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेताना अधिक खबरदारी घेण्याच्या सूचना पुन्हा एकदा देण्यात येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news