

पुढारी ऑनलाईन डेस्क : दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर आज नक्षलवादी आणि सुरक्षा दलांची चकमक झाली. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. आतापर्यंत सात नक्षली ठार झाल्याचे वृत्त ANIने दिले आहे.
नक्षलविरोधी शोध मोहिमेत, नारायणपूर, दंतेवाडा, जगदलपूर, कोंडागाव जिल्ह्यातील डीआरजीसह एसटीएफ-सीआरपीएफची संयुक्त दल दक्षिण अबुझमद परिसरात रवाना झाली होती. आज पहाटे तीन पासून संयुक्त सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये अधूनमधून चकमक सुरू आहे. नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला पोलीस जवान चोख प्रत्युत्तर देत आहेत. शोध मोहिमेदरम्यान आतापर्यंत 7 गणवेशधारी नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे, असे बस्तरचे पोलीस महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी स्पष्ट केले आहे.
दक्षिण अबुझमदच्या जंगलात आज पहाटेपासून सुरु असलेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले आहेत. राज्यात यावर्षी 220 नक्षलवादी चकमकीत ठार झाले आहेत, अशी माहिती छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना दिली.