

नवी दिल्ली : Maharashtra MLC Election : महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत सात काँग्रेस आमदारांच्या क्रॉस व्होटिंगमुळे निर्माण झालेल्या नाराजीचा सूर दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. या संदर्भातील अहवाल राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पक्षाचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे सोपवल्याचे समजते.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी दोघेही सध्या दिल्लीत नसल्यामुळे कारवाई लांबण्याची शक्यता आहे. मात्र त्यांचा संदेश मिळाल्यास क्रॉस व्होटिंग करणाऱ्या सात आमदारावंर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. याचसंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सोमवारपासून दिल्लीत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेतृत्वाला आमदारांच्या क्रॉस व्होटिंगचे कारण जाणून घ्यायचे होते. क्रॉस व्होटींग करणाऱ्या आमदारांवर कडक कारवाई करण्याचे संकेत नाना पटोले यांनी आधीच दिले होते. क्रॉस व्होटिंग करणाऱ्यांची ओळख पटली असल्याचेही ते म्हणाले होते. दरम्यान, हायकमांड पक्षातील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी काही कठोर निर्णय घेण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रातील चांगल्या कामगिरीमुळे काँग्रेसचे मनोबल उंचावले आहे. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू इच्छित नाही. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांचे क्रॉस व्होटिंग झाल्याच्या घटनेने राज्यातील संघटनेत सर्व काही सुरळीत नसल्याचे संकेत दिले आहेत.