पुढारी ऑनलाईन डेस्क
गेल्या १४ महिन्यांत ९ महिलांच्या हत्येमुळे उत्तर प्रदेशातील बरेली जिल्हा (Serial Killer In UP Bareilly) हादरला आहे. या महिलांच्या हत्येमागे एक सीरियल किलर (serial killer) असू शकते, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संशयामागील एक प्रमुख कारण म्हणजे सर्व हत्यांच्या घटनांमध्ये साडीचा वापर केला आहे. यामुळे हे एकाच मारेकरी अथवा गँगचे काम असू शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ज्या महिलांचा खून झाला आहे; त्यांचे वय जवळपास सारखेच होते. तसेच सर्व घटनांमध्ये खून करण्याची पद्धतही सारखीच असल्याचे समोर आले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व महिलांचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. यातील बहुतांश महिलांचा गळा त्यांच्या साडीनेचे आवळण्यात आला आहे.
गेल्या १४ महिन्यांत ९ महिलांची एकाच पद्धतीने हत्या झाल्याचे आढळून आल्याने बरेली जिल्ह्यातील एका ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण आहे. २५ किमी परिघातात आणि दोन पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रातील गावांत घडलेल्या या हत्यांच्या घटनांनी एक अस्वस्थ करणारा, पण वेगळा पॅटर्न उघडकीस आलाय. ज्या ९ महिलांचा खून झाला आहे; त्या सर्व ४५ ते ५५ वयोगटातील आहेत. या महिलांचे दुपारच्या सुमारास शेतात गळा आवळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आले आहेत. त्यांचे कपडे विखुरलेले आढळून आले आहेत. पण त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे कोणतीही चिन्हे दिसून आलेली नाहीत.
द टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बरेलीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अनुराग आर्य यांनी सांगितले, "हत्येचा पॅटर्न स्पष्ट आहे. दुपारच्या सुमारास महिलांचे गळा आवळून खून करण्यात आले आहेत. त्यांचे मृतदेह शेतात फेकून देण्यात आले होते. शवचिकित्सा अहवालात लैंगिक अत्याचाराची शक्यता नाकारण्यात आली आहे." (Uttar Pradesh police)
तपास यंत्रणांना संशय आहे की अटक करण्यात आलेले तीन आरोपी खरे गुन्हेगार नसावेत. कारण ते तुरुंगात असताना महिलांच्या हत्येच्या घटना घडल्या आहेत. वरिष्ठ अधिकारी आता हल्लीच जामीन मिळालेल्या अथवा तुरुंगातून सुटलेल्या कैद्यांच्या तपशीलांची छाननी करत आहेत. या हत्या प्रकरणांचा छडा लावता न आल्याने पोलिस आता पारंपारिक पद्धतींकडे वळले आहेत. ९० गावांतील शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर पोलिसांनी संशयितांची रेखाचित्रे जारी केली आहेत.
गेल्या वर्षी जूनमध्ये पहिल्यांदा एका महिलेचा मृतदेह सापडला होता. तेव्हापासून महिलांच्या हत्येचे सत्र सुरु आहे. ३ जुलै रोजी बरेलीच्या शाही शीशगढ भागातील एका शेतात ४५ वर्षीय महिला मृतावस्थेत आढळून आली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत खून झालेल्या महिलांची संख्या वाढून ८ झाली होती. ज्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पण खुनाचे सत्र सुरूच राहिल्याने गूढ आणि दहशत आणखी वाढली आहे.