

नवी दिल्ली : इंडिया आघाडीतील मतभेदाची चर्चा सहजच सुरू झालेली नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचे नेतृत्व करावे, या मागणीमागे त्यांच्या राज्याची स्थिती दडलेली आहे. राज्यात तृणमूल सरकारच्या विरोधात वातावरण झपाट्याने तयार होत आहे. पक्षांतर्गत गटबाजीही सुरू आहे. या प्रादेशिक मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी ममता बॅनर्जींनीच केंद्रीय राजकारणात हा डाव टाकला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांचे म्हणणे इंडिया आघाडीतील घटकपक्षांना पटत आहे. यामुळे विविध राज्यातील काँग्रेसचा हस्तक्षेप घटकपक्षांना कमी करता येईल. पश्चिम बंगाल आणि काही ईशान्येकडील राज्यांशिवाय तृणमूलचे फारसे अस्तित्व देशात नाही. अशा स्थितीत काँग्रेस वगळता इंडिया आघाडीतील अन्य कोणत्याही पक्षाला तृणमूलची अडचण नाही. यामुळेच समाजवादी पक्ष आणि आम आदमी पार्टीनंतर आता राष्ट्रीय जनता दलही ममता बॅनर्जींना ताकद दिली आहे. आगामी काळात इंडिया आघाडीचे आणखी काही घटक पक्ष दलही ममता बॅनर्जींच्या बाजूने उभे राहू शकतात. इंडिया आघाडीतील काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे ज्याचा संपूर्ण देशात विस्तार आहे. यामुळे कुठल्याही निवडणुकीत मित्रपक्षांना त्यांच्या राज्यात काँग्रेसला जागा देणे भाग आहे. असे असले तरी घटकपक्षांना काँग्रेसवर दबाव कायम ठेवण्याची ही चांगली संधी आहे.
दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये तृणमूलमध्येच ममता बॅनर्जी आणि त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. ममता बॅनर्जी यांनी आता आपल्या पुतण्याला बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अभिषेक बॅनर्जी यांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांचे पक्षातील वजन कमी होत आहे. त्यासाठी त्यांनी संघटनेत अनेक बदलही केले आहेत. शिवाय राज्यातही ममता सरकारच्या विरोधात आवाज उठू लागला आहे. या सगळ्यावरून लक्ष हटवण्यासाठी ममता बॅनर्जींनीच केंद्रीय राजकारणाचा मुद्दा बनवायला सुरुवात केली आहे. जेणेकरून लोकांचे लक्ष राज्याच्या राजकारणातून केंद्राच्या राजकारणाकडे वळेल. यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांच्या राजवटीत मुख्यमंत्री ज्योती बसू यांनीही असेच डावपेच खेळले आहेत.