Ram Mandir Parliament attack plot | राम मंदिर, संसदेवर हल्ल्याचा कट?

दिल्ली पोलिसांनी चौघांना केली अटक; ठाणे, मुंबईतील दोघांचा सहभाग
Ram Mandir Parliament attack plot |
Ram Mandir Parliament attack plot | राम मंदिर, संसदेवर हल्ल्याचा कट?
Published on
Updated on

नवी दिल्ली : ठाणे, मुंबई, ओडिशा आणि बिहार येथील चार कट्टरपंथी तरुणांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. देशातील दहशतवादी विचारसरणी आणि दहशतवादी कारवायांच्या नियोजनात त्यांच्या कथित सहभागाबद्दल ही कारवाई करण्यात आली. त्यांचे लक्ष्य राम मंदिर, संसद, लष्करी तळ, लाल किल्ला आणि इंडिया गेट यासारखी ठिकाणे होती, अशी माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपींपैकी एकाने संभाव्य लक्ष्य म्हणून डिसेंबर 2025 मध्ये लाल किल्ला आणि इंडिया गेटची टेहळणी केली होती. एसीपी आशिष कुमार यांच्या नेतृत्वातील नवी दिल्ली रेंजच्या (एनडीआर) पथकाने अलीकडेच ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींची ओळख पटली असून, त्यात ठाण्यातील वेल्डर मोसाईब अहमद ऊर्फ सोनू ऊर्फ कलाम, मुंबईत बारावीचे शिक्षण घेत असलेला मोहम्मद हम्माद, भुवनेश्वर येथील सुरक्षा रक्षक शेख इम्रान आणि कटिहार येथील प्लम्बर मोहम्मद सोहेल यांचा समावेश आहे.

पोलिस उपायुक्त (विशेष कक्ष) प्रवीणकुमार त्रिपाठी यांनी सांगितले की, आरोपी खिलाफत स्थापन करण्यावर केंद्रित असलेल्या विचारसरणीने प्रभावित होते आणि ‘खुरासानमधून लष्कर’ नावाच्या संघटनेच्या उदयावर त्यांचा विश्वास होता. ते कथितरीत्या या गटात सामील होण्याची आणि ‘गझवा-ए-हिंद’मध्ये सहभागी होण्याची तयारी करत होते. तसेच, इतरांना कट्टरपंथी बनवून त्यांची भरती करण्याचा प्रयत्न करत होते. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी स्फोटक उपकरणासाठी (आयईडी) लागणारे साहित्य जप्त केले आणि न्यायवैद्यक तपासणीसाठी अनेक मोबाईल उपकरणे ताब्यात घेतली, असे त्रिपाठी म्हणाले.

आरोपी एन्क्रिप्टेड सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ग्रुपचे सदस्य होते. त्यावर कट्टरतावादी मजकूर शेअर केला जात होता. जिहाद व इस्लामिक राज्य स्थापन करण्यासंदर्भात चर्चा होत होती. मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या शेख इम्रानने यात मध्यवर्ती भूमिका बजावली असल्याचे मानले जाते. त्याने संभाव्य लक्ष्यांवर चर्चा केली. यात राम मंदिर, संसद, लष्करी तळ, लाल किल्ला आणि इंडिया गेट यासारख्या संवेदनशील ठिकाणांचा समावेश होता. त्याने डिसेंबर 2025 मध्ये रेकीसाठी दिल्लीला भेट दिली होती. सदस्यांसाठी शस्त्रे आणि शारीरिक प्रशिक्षणाची व्यवस्था करण्याचे आश्वासनही दिले होते.

खेळण्याच्या गाडीचा वापर स्फोटासाठी

त्रिपाठी म्हणाले की, ग्रुपचे दोन सदस्य रिमोट कंट्रोल आयईडी तयार करण्यासाठी स्थानिक पातळीवर साहित्य सक्रियपणे गोळा करत होते. आरोपींपैकी एकाने कथितरीत्या बॉल बेअरिंग, खिळे आणि एका बदल केलेल्या खेळण्यातील गाडीचे फोटो शेअर केले होते, ते या उपकरणात वापरले जाणार होते. दुसरा आरोपी क्यूआर कोड आणि बँक तपशिलाद्वारे निधी गोळा करत होता आणि हा पैसा जिहादसंबंधित कारवायांना मदत करेल, असा दावा करत होता.

कट्टरतावादी व्याख्यानांचा प्रभाव

तपासात सहभागी असलेल्या पोलिस अधिकार्‍यांनी दावा केला की, आरोपी हे कट्टरतावादी धर्मोपदेशकांच्या ऑनलाईन व्याख्यानांनी प्रभावित झाले होते आणि त्यांच्यामध्ये हळूहळू दहशतवादी विचारसरणी विकसित झाली होती. एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, त्यातील एका आरोपीने तर इतरांना चिथावणी देण्यासाठी लाल किल्ल्यावर काळा झेंडा फडकत असलेला एक एडिटेड फोटो समाजमाध्यमांवर पोस्ट केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news