इंदौर; पुढारी ऑनलाईन: भारतामध्ये सध्या आलेली कोरोनाची दुसरी लाट हे चीनचे भारताविरोधात विषाणू युद्धच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार चीनला आव्हान दिले आहे.त्यामुळेच कोरोनाच्या दुसर्या लाटेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता संपविण्याचा कट चीनकडून रचला गेला आहे, असा दावा भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी केला.
अधिक वाचा : भारताच्या कठोर भूमिकेनंतर 'facebook'चे मोठे विधान, म्हणाले…
देशभरात कोरानाच्या दुसर्या लाटेचा प्रकोप सुरु आहे. या महामारीत देशभरात दररोज लाखो नवे रुग्ण आढळत आहेत. तर हजारो नागरिकांचा मृत्यू होत आहे. या पार्श्वभूमीवर इंदौर येथील ग्रामीण भागात ऑक्सिजन कंसन्ट्रेटर वितरण कार्यक्रमात बोलताना विजयवर्गीय म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट आली आहे की, कोणी पाठवली आहे, याचा विचार होण्याची गरज आहे. भारताच्या अडचणीत वाढ करण्यासाठी चीनचे भारताविरोधात विषाणू युद्ध सुरु केले आहे. कोरोनाची दुसरी लाट केवळ भारतातच आली. शेजारचे देश पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि भूतान येथे कोरोनाची दुसरी लाट आलेली नाही. हाच संशोधनाचा विषय आहे, असेही ते म्हणाले.
अधिक वाचा : नागरिकांच्या मानसिकतेवर कोरोनाचा हल्ला
भारतात तयार झालेल्या कोरोना विषाणूमुळेच दुसरी लाट पसरली आहे, असे विधान काँग्रेस नेते कमलनाथ यांनी केले. चीन हा काँग्रेस आणि कमलनाथ यांच्या खाद्यांवर बदुंक ठेवून संपूर्ण देशाला बदनाम करत आहे. काँग्रेस चीनसाठी राजकारण करत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. देशाला ऑक्सिजन संकटातून वाचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व उपाययोजना केल्या आहेत,असेही त्यांनी सांगितले. कोरोना संकटकाळात एक राष्ट्र म्हणून सर्वांची एकजूट आवश्यक आहे. सध्या पक्षासाठी नव्हे तर देशासाठी काम करण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.