नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल मागील तब्बल ५१ दिवसांपासून खनौरी सीमेवर बेमुदत उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तरीही शेतकऱ्यांच्या शेतीमालाला एमएसपी मिळावा यांसह १३ विविध मागण्यांसाठी ते बेमुदत उपोषण करण्यावर ठाम आहेत. त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. दरम्यान, डल्लेवाल यांच्या आरोग्याचा सविस्तर वैद्यकीय अहवाल सर्वोच्च न्यायालयाने मागवला आहे.
७० वर्षीय डल्लेवाल यांनी २६ नोव्हेंबर २०२४ पासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. आधीच त्यांना बोलायला त्रास होत होता. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, त्यांचे शरीर आता पाणीही पचवू शकत नाही. सरकारी आणि खासगी डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. तरीही डल्लेवार मात्र, ठाम आहेत. त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. पंजाब सरकारने आमरण उपोषण स्थळाजवळ तात्पुरते रुग्णालय आणि रुग्णवाहिका तैनात केली आहे. जेणेकरुन कोणत्याही अनुचित परिस्थितीला तोंड देता येईल. मात्र, डल्लेवाल वैद्यकीय सेवा घेत नाहीत.
शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांच्या सविस्तर आरोग्य अहवालाची माहिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने पंजाब सरकारला सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, डल्लेवाल यांच्या आरोग्य अहवालावर एम्सच्या वैद्यकीय मंडळाचे मत घेतले जाईल. डल्लेवाल यांची प्रकृती स्थिर असल्याचे सुनावणीवेळी पंजाब सरकारने न्यायालयाला सांगितले.
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन झाले होते. त्या आंदोलनाताही जगजीत सिंह डल्लेवाल सहभागी होते. मात्र, तेव्हा त्यांचे नाव चर्चेत आले नव्हते. आता मात्र, शेतकरी आंदोलनाचा आवाज डल्लेवाल झाले आहेत.
शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) कायदा करा, अशी प्रमुख डल्लेवाल यांची आहे. मागील ३ दशकांमध्ये सुमारे ७ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. केंद्र सरकारने हा कायदा केला तर देशभरातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील, असे त्यांनी एका लेखामध्ये म्हटले आहे. एमएसपी कायद्यामुळे देशाच्या संपत्तीचे रक्षण होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
३१ डिसेंबर रोजी पंजाबचे महाधिवक्ता गुरमिंदर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते की, शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला एक प्रस्ताव दिला आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करायला तयार असेल डल्लेवाल वैद्यकीय मदत घेण्यास तयार आहेत. मात्र, केंद्र सरकार या सर्व प्रकणावर काही बोलले नाही.
संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम) ने घोषणा केली आहे की, बुधवारपासून खानौरीमध्ये आणखी १११ शेतकरी आमरण उपोषण सुरू करतील. अशाप्रकारे, आता फक्त एक नाही तर ११२ ‘डल्लेवाल’ आमरण उपोषण करतील. ५१ दिवसांच्या उपोषणादरम्यान, पंजाब सरकारचे प्रतिनिधी, राजकीय नेते, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते अनेक वेळा डल्लेवाल यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना भेटले आहेत.