Congress Politics : ‘गोध्रा’ नाव घेत काँग्रेसने मारले एका दगडात दोन पक्षी

New Delhi Political News । पटेलांच्या जयंतीच्या निमित्ताने काँग्रेसने भाजपला दिला संदेश
New Delhi Political News
काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते जयराम रमेश .File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त ‘गोध्रा’ नाव घेत काँग्रेसने एका दगडात दोन पक्षी मारले. एक तर गोध्राचे नाव घेतले आणि दुसरे म्हणजे सरदार पटेलांना कट्टर काँग्रेस नेते म्हणून दाखवले. सरदार पटेलांच्या जयंतीच्या निमित्ताने काँग्रेसने भाजपला संदेश दिला आहे. विशेषत: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी सरदार पटेलांचे भांडवल करण्याचा प्रयत्न रोखण्यासाठी काँग्रेसने गोध्रा येथील पुतळ्याचे केलेले अनावरणाची आठवण सांगितली.

पंतप्रधानांनी काढली महाराष्‍ट्राची आठवण

दुसरीकडे सरदार पटेल जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी आज केवडियात महाराष्ट्राची आठवण काढली. ते म्हणाले की, केवडियात एकता नगरमध्ये महाराष्ट्रातील ऐतिहासिक रायगड किल्ल्याची प्रतिमा दिसते, जी सामाजिक न्याय, देशभक्ती आणि राष्ट्र प्रथम या मूल्यांची पवित्र भूमी आहे. सरदार पटेल यांचे १५० वे जयंती वर्ष आजपासून सुरू होत आहे. पुढची २ वर्षात देश सरदार पटेल यांची १५० वी जयंती साजरी करणार आहे.

देशातील पहिले व्यक्ती ज्‍यांचा जिवंतपणी पुतळा

काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांनी 'एक्स' या सोशल मीडिया साइटवर सांगितले की, सरदार पटेल हे देशातील पहिले व्यक्ती होते ज्यांचा पुतळा ते जिवंत असताना बनवण्यात आला. हा पुतळा देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी बांधला होता. या कांस्य पुतळ्याचे अनावरण नेहरूंच्या हस्ते गुजरातमधील गोध्रा येथे झाले होते.

पटेलांचा वारसा सांगणाऱ्यांचा ढोंगीपणा उघड

सरदार पटेल जयंतीचे निमित्ताने जयराम रमेश यांनी गोध्राचे नाव घेऊन राजकीय वक्तव्य केले. ते म्हणाले की, आज सरदार पटेलांची १४९ वी जयंती आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील ते अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी १९४७ नंतर भारताच्या निर्मितीला आकार दिला आणि १९४८, १९४९ आणि १९५० या वर्षांमध्ये देशाला मार्गदर्शन केले. ते काँग्रेसचे दिग्गज नेतेही होते. आज त्यांचा वारसा सांगण्याचा प्रयत्न त्या लोकांकडून सतत होत असतो ज्यांच्या वैचारिक गुरूंनी भारत छोडो आंदोलनाला विरोध केला होता. ज्यामध्ये सरदार पटेलांना जवळपास तीन वर्षे तुरुंगात राहावे लागले. हे अलीकडे वारसा सांगणाऱ्यांची असुरक्षितता आणि ढोंगीपणा उघड करते.

जयराम रमेश म्हणाले की, १३ फेब्रुवारी १९४९ रोजी जवाहरलाल नेहरू यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी गोध्रा येथे भेट दिली होती. तो पुतळा गोध्रा येथील स्थानिक काँग्रेसजनांनी बसवला होता, याच ठिकाणाहून सरदार पटेलांनी वकीलीची सुरूवात केली होती. पंडीत नेहरुंनी आनंद येथे सरदार पटेल यांच्या नावाने वल्लभ विद्या नगर नावाच्या शैक्षणिक संकुलाच्या पायाभरणी केली.

स्वतंत्र भारताच्या उभारणीत सरदार पटेलांचे अनोखे योगदान

गोध्रा येथे बोलताना नेहरू म्हणाले होते की, ते पुतळ्यांच्या, विशेषत: जिवंत व्यक्तींच्या पुतळ्यांच्या अनावरणाच्या विरोधात होते. मात्र सरदार पटेलांच्या पुतळ्याच्या अनावरणाला त्यांनी अपवाद म्हटले. कारण ते त्यांचे सर्वात जवळचे सहकारी होते आणि स्वतंत्र भारताच्या उभारणीत सरदारांच्या अनोख्या योगदानाने त्यांना तसे करण्यास भाग पाडले. पुढे सरदार पटेल यांचे डिसेंबर १९५० मध्ये निधन झाले. या पुतळ्याच्या पायावर गुजराती शिलालेखात “१३.२.१९४९ रोजी माननीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला”, असे लिहिलेले आहे, असेही जयराम रमेश म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news