

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्यांसाठी छावा चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग झाल्यानंतर संसदेतही या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग होणार आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मंत्री आणि खासदारांना देखील या चित्रपटाचे निमंत्रण असणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याच आठवड्यात संसदेत छावा चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग होणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून देशात या चित्रपटाची मोठी चर्चा आहे. या चित्रपटातील अभिनेता विकी कौशलने देखील विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभर हजेरी लावली आहे. या सर्व घडामोडींच्या दरम्यान महाराष्ट्र विधिमंडळाच्या सर्व सदस्यांसाठी मुंबईत विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री, राज्यातील आमदार देखील उपस्थित होते. यानंतर आता संसदेत देखील या चित्रपटाचे स्क्रीनिंग होत आहे. संसदेत छावाच्या विशेष स्क्रीनिंगच्या वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते यांनाही बोलावले जाण्याची शक्यता आहे.
संसदेतील ग्रंथालय भवनाच्या बालयोगी सभागृहात छावा चित्रपटाचे स्क्रीनिंग होणार आहे. मात्र या स्क्रीनिंगच्या वेळी विरोधी पक्षांचे खासदार उपस्थित राहतात का, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग संसदेत करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्र सरकारमधील जवळजवळ सर्व मंत्री आणि खासदार उपस्थित होते.
छावा चित्रपट संसदेत दाखवला जाणार असल्यामुळे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनाही या चित्रपटाचे निमंत्रण दिले जाईल. सोबतच काँग्रेसच्या खासदारांनाही या चित्रपटाचे निमंत्रण असेल. त्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे खासदार यावेळी उपस्थित राहणार का, याकडेही सगळ्यांचे लक्ष लागून असेल.