

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत ‘महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला. त्यानंतर राजकारण तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरुन जोरदार टीका केली. त्यानंतर केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, तुम्हाला माहिती आहे का हा पुरस्कार कोणी दिला? राजकीय नेत्यांना दिले जाणारे असे पुरस्कार एकतर खरेदी केले जातात किंवा विकले जातात. यावर पलटवार करताना केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, मराठा समाज पाहत आहे. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे आदर्श सोडून दिले, हिंदुत्व आणि मराठा स्वाभिमानाचा अपमान केला, ते मराठा अभिमानाने कसे वागतील? ज्यांनी त्यांच्या समाजात आदर आणि पाठिंबा गमावला आहे त्यांना इतरांना सन्मानित केल्याबद्दल दुःख होते, असे केंद्रीय मंत्री शिंदे म्हणाले.
यानंतर पुन्हा संजय राऊत यांनी ‘एक्स’वर पोस्ट करुन प्रत्युत्तर दिले आहे. महाराज, इतिहास समजून घ्या. वीर महादजी शिंदे हे महान स्वाभिमानी मराठा योद्धा होते. त्यांच्या नावे पळपुट्यांना पुरस्कार देणे हा महादजी शिंदे यांचा अपमान आहे. एकनाथ शिंदे यांना जयाजीराव शिंदे यांच्या नावे पुरस्कार द्यायला काहीच हरकत नाही. महादजी शिंदे यांनी दिल्ली पुढे लोटांगण घातले नाही, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, जयाजीराव शिंदे यांनी १८४३ ते १८८६ पर्यंत ग्वाल्हेरचे महाराजा म्हणून राज्य केले आणि १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात त्यांनी ब्रिटिशांची बाजू घेतली. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांना संजय राऊतांनी टोला लगावला.