भाजप अध्यक्षपदासाठी संघाची संजय जोशींना पसंती

शिवराजसिंह चौहान, वसुंधराराजे यांच्या नावापुढे फुली!
भाजप अध्यक्षपदासाठी संघाची संजय जोशींना पसंती
भाजप अध्यक्षपदासाठी संघाची संजय जोशींना पसंतीPudhari File Photo
Published on
Updated on

जाल खंबाटा

नवी दिल्ली : भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांचा कार्यकाळ संपल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून संजय जोशी यांच्या नावाला पसंती दिली आहे. त्याचवेळी अध्यक्षपदाच्या स्पर्धेत असलेले शिवराजसिंह चौहान आणि वसुंधराराजे यांच्या नावापुढे फुली मारली आहे. भारतीय जनता पक्षातील ही मोठी घडामोड मानली जात आहे.

पेशाने अभियंता असलेले आणि अद्यापही अविवाहित संजय जोशी यांनी पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून स्वतःला संघासाठी वाहून घेतले आहे. त्यांचे एका वादग्रस्त महिलेशी कथित संबंध असल्याची सीडी समोर आल्यानंतर भाजपमधून 2005 मध्ये त्यांना पदावरून दूर करण्यात आले होते. आता त्यांच्याच नावाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून संघाने सर्वाधिक पसंती दर्शवली आहे. जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ या वर्षाच्या अखेरीस संपल्यानंतर राष्ट्रीयस्तरावर संघटन महासचिव म्हणून यशस्वी छाप पाडणार्‍या संजय जोशी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे, असे सरसंघचालक मोहन भागवत यांना वाटत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजेही या पदासाठी इच्छुक आहेत. तथापि, संघाने या दोन्ही नावांपुढे फुली मारली असल्याचे समजते. संजय जोशी यांना राष्ट्रीयस्तरावर भाजपचे संघटक सरचिटणीस आणि त्यापूर्वी गुजरात भाजपचे संघटन सचिव या नात्याने राजकारणासह पक्ष-संघटनेचा दांडगा अनुभव असल्यामुळे त्यांनी हे पद घ्यावे, अशी संघाची इच्छा आहे.

मोदी-जोशी मैत्रीत वितुष्ट

एकेकाळी जोशी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जवळचे मित्र होते. मात्र, मोदी समर्थकांनी सुमारे सतरा वर्षांपूर्वी या दोघांत तेढ निर्माण केली. तेव्हापासून जोशींना विजनवासात जाणे भाग पडले. 1995 मध्ये गुजरातमध्ये भाजपचे सरकार येण्यासाठी जोशी गुजरात भाजपचे संघटक सचिव म्हणून यशस्वी झाले. जोशी नंतर गुजरात भाजपचे संघटक सरचिटणीस बनले आणि त्याच वेळी मोदी यांना राष्ट्रीय पक्षाचे सरचिटणीस म्हणून हटवण्यात आले. मोदी यांना गुजरातचे मुख्यमंत्री व्हायचे होते. तथापि, त्यासाठी त्यांना 2001 पर्यंत वाट पाहावी लागली. जेव्हा मोदी मुख्यमंत्री झाले, तेव्हा राष्ट्रीय संघटक सरचिटणीस म्हणून जोशी यांना दिल्लीला पाठवण्यात आले. तेव्हापासून दोघेही एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news