

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच आरबीआयने देशभरातील बँकांसाठी बचत खात्यांवरील व्याज दरांशी, एफडी व चालू खात्यांशी संबंधित नवे नियम जारी केले आहेत. त्यानुसार बँकांना बचत खात्यातील एक लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर समान दराने व्याज द्यावे लागणार आहे. याचा मोठा फायदा खातेदारांना होणार आहे.
खात्यातील रक्कम एक लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास वेगळे व्याज दर लागू करता येतील. प्रत्येक दिवसाच्या शेवटी खात्यात जमा केलेल्या रकमेनुसार व्याज आकारले जाईल. बँकांना दर तीन महिन्यांनी एकदा खात्यात व्याज जमा करावे लागणार आहे. एफडीचा मॅच्युरिटी कालावधी व्यवसाय नसलेल्या दिवशी आला तरीही ग्राहकाला त्या दिवसाचे व्याज मिळेल आणि बँक पुढच्या व्यवसायाच्या दिवशी पेमेंट करेल. बँकांनी सर्व एफडी नियम ग्राहकांना आगाऊ सांगितले पाहिजेत. बँका स्वतः दंडाची रक्कम ठरवू शकतात. ग्राहक आणि बँक यांच्यात व्याज दरावर कोणत्याही वाटाघाटी होणार नाहीत, असेही आरबीआयच्या सूत्रांनी म्हटले आहे.
‘हे’ नियमदेखील लागू
बँक कर्मचारी, निवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना एफडी, बचत खात्यावर एक टक्का अतिरिक्त व्याज दिले जाऊ शकते. बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र, जास्त व्याज दराच्या एफडी योजना देऊ शकतात. जर मुदत ठेवीच्या (टीडी) मुदतपूर्तीनंतर रक्कम काढली गेली नाही, तर बचत खात्याचा व्याज दर किंवा टीडीचा मूळ व्याज दर यातील सर्वात कमी व्याज दर लागू होईल. 3 कोटी व त्यापेक्षा अधिक एफडीवर वेगळे व्याज दर लागू होतील. साधारणपणे चालू खात्यावर (करंट अकाऊंट) कोणतेही व्याज दिले जात नाही. मात्र, खातेधारकाच्या मृत्यूच्या बाबतीत, मृत्यूच्या तारखेपासून पैसे भरेपर्यंत बचत खात्याच्या दराने व्याज दिले जाणार?आहे. हे नियम ग्राहकांच्या हितासाठी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.