

पुढारी ऑनलाईन डेस्क : संभलच्या शाही जामा मशिदीच्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने मशिदीला रंगवण्याची परवानगी दिली नाही. न्यायालयाने म्हटले की, सध्या मशिदीची फक्त स्वच्छता करावी, तिला रंगवण्याची गरज नाही. भारतीय पुरातत्व विभागाच्या अहवालानंतर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी होईल. या घटनेची माहिती वृत्तसंस्था 'एएनआय'ने सोशल मिडीया हँडल 'एक्स'वर ट्वीट करत दिली आहे.
दुसरीकडे, २४ नोव्हेंबर रोजी संभळ येथे झालेल्या दंगलीसंदर्भात जबाब नोंदवण्यासाठी न्यायिक चौकशी आयोगाचे तीन सदस्यीय पथक शुक्रवारी शहरात आहे. आयोगाचे सदस्य संभळच्या पीडब्ल्यूडी गेस्ट हाऊसमध्ये सामान्य लोकांचे जबाब नोंदवतील. टीमचे सदस्य शनिवारीही जिल्ह्यातच राहतील आणि दंगलीच्या वेळी उपस्थित असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवतील. जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान गोंधळ झाल्याची माहिती आहे. यामध्ये पाच जणांना आपला जीव गमवावा लागला. २९ पोलिस आणि अनेक लोक जखमी झाले. दंगलखोरांनी पोलिसांवर गोळीबार केला आणि जाळपोळ आणि तोडफोड केली. या घटनेमुळे तीन सदस्यीय न्यायालयीन चौकशी आयोग स्थापन करण्यात आला.