

उत्तर प्रदेशमधील विरोधी पक्ष समाजवादी पार्टीने तीन आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. राकेश प्रताप सिंह, अभय सिंह आणि मनोज कुमार पांडे अशी कारवाई करण्यात आलेल्या आमदारांची नावे आहेत. यासंदर्भातील माहिती पक्षाने सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत दिली आहे.
सांप्रदायिक फुटीरतावादासह शेतकरीविरोधी, महिलाविरोधी, युवकविरोधी, व्यवसायविरोधी, रोजगारविरोधी विचारसरणीला पाठिंबा दिल्यामुळे गोसाईगंजचे आमदार अभय सिंह, गौरीगंजचे आमदार राकेश प्रताप सिंह आणि उंचहारचे आमदार मनोज कुमार पांडे यांच्यावर कारवाई केल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे की, या लोकांना हृदयपरिवर्तनासाठी दिलेली 'कृपा-कालावधी'ची मुदत आता पूर्ण झाली आहे, उर्वरित वेळ चांगल्या वर्तनामुळे शिल्लक आहे. भविष्यातही समाजवादी पार्टीमध्ये 'जनविरोधी' लोकांना स्थान असणार नाही. पक्षाच्या मूलभूत विचारसरणीला विरोध करणाऱ्या कृती नेहमीच अक्षम्य मानल्या जातील. तुम्ही कुठेही राहा, विश्वासार्ह रहा.
मनोज पांडे हे रायबरेलीच्या उंचाहार मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्ष सोडला होता. राज्यसभेच्या जागेवर क्रॉस व्होटिंग केल्यानंतर ते भाजपमध्ये सहभागी झाले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी रायबरेलीच्या जागेवरून मनोज पांडे यांना तिकीट दिले जाऊ शकते असे संकेत मिळाले होते. मात्र दिनेश प्रताप सिंह यांना रायबरेलीचे तिकीट मिळाले. विशेष म्हणजे मनोज पांडे यांनी दिनेश प्रताप सिंह यांच्या सभांपासून अंतर ठेवले होते. त्यांची नाराजी ओळखून गृहमंत्री अमित शाह त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते.