

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार बॅडमिंटनपटू आणि भारताच्या क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरा सायना नेहवाल हिने रविवारी, १३ जुलै २०२५ रोजी तिचा दीर्घकालीन जोडीदार पारुपल्ली कश्यपपासून विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला. सायनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही माहिती दिली.
सायना आणि पारुपल्ली यांचे लग्न २०१८ साली झाले होते. सुमारे ७ वर्षांच्या सहजीवनानंतर, त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे सायनाच्या वक्तव्यात स्पष्ट झाले आहे. हैदराबादमधील पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकादमीत दोघेही एकत्र प्रशिक्षण घेत होते. या काळात दोघांमध्ये स्नेह निर्माण झाला आणि तो पुढे वैवाहिक नात्यात रूपांतरित झाला. दोघांनीही भारतीय बॅडमिंटन क्षेत्रात आपला ठसा उमटवला.
सायना नेहवालने ऑलिंपिक कांस्यपदक, तसेच जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान मिळवून देशासाठी अभिमानाची गोष्ट घडवली. तर पारुपल्ली कश्यपने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक, आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आपली ओळख निर्माण केली. सायनाच्या या निर्णयाची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे, मात्र दोघांनीही आपापल्या खासगी आयुष्याबाबत अधिक खुलासा केलेला नाही.