

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी (दि.16) चाकू हल्ला झाला होता. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरट्याने त्याच्यावर सहा वार केले होते. यानंतर त्याला लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर 6 तास शस्त्रक्रिया चालली, शस्त्रक्रियेमध्ये त्याच्या शरीरातून 2.5 इंचाचा चाकुचा तुकडा काढण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सैफला मंगळवारी (दि.21) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी सैफ अली खान एकदम तंदुरुस्त दिसला. यानंतर या घडलेल्या घटनेवर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी सोशल मिडीया हँडल 'X'वर पाेस्ट करत या घटनेवर अप्रत्यक्षरीत्या संशय व्यक्त केला आहे.
निरुपम यांनी केलेल्या पाेस्टमध्ये म्हटले आहे की, डॉक्टरांनी म्हटलं हाेतं की, सैफ अली खानच्या पाठीत चाकू 2.5 इंच आत घुसला होता. कदाचित तो आत अडकला असावा. हे ऑपरेशन सलग 6 तास चालले. हे सर्व 16 जानेवारी रोजी घडले. आज 21 जानेवारी आहे. हॉस्पिटलमधून बाहेर पडताच इतका तंदुरुस्त झाला? फक्त 5 दिवसात? अद्भुत! या ट्वीटमुळे सैफवर झालेल्या हल्ल्याला संशयाची किनार लागल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
सैफ याच्यावरील हल्ल्याची घटना गुरुवारी वांद्रे (पश्चिम) येथील अकराव्या मजल्यावरील त्याच्या फ्लॅटमध्ये घडली. चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने घुसून सैफवर चाकूने वार केले. वांद्रे पोलिसांनी सांगितले की, सैफ झोपेतून जागा झाल्यावर संशयिताने त्याच्यावर चाकूने हल्ला केला आणि त्यानंतर तो पळून गेला. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास सैफला त्यांचा मोठा मुलगा इब्राहिम आणि त्यांच्या जवळच्या लोकांनी वांद्रे रिक्लॅमेशन येथील लीलावती रुग्णालयात दाखल केले. "त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने सहा जखमा आढळून आल्या आहेत," असे लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ. निरज उत्तमानी यांनी सांगितले हाेते.