साहित्य संमेलन म्हणजे मराठी भाषेचा महाकुंभ : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Marathi Sahitya Sammelan| साहित्य संमलेनाचा समारोप, दिल्लीतील मराठी लोकांसाठी भवन होणारः अजित पवार
Marathi Sahitya Sammelan
अखिल भारतीय साहित्‍य संमेलनाच्या समारोपप्रसंगी उपस्‍थित मान्यवर. Pudhari Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमलेनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांचा सत्कार करून संमेलनाचा समारोप झाला. यावेळी दिल्लीतील साहित्य संमेलन म्हणजे मराठी भाषेचा महाकुंभ आहे, असे उद्गार याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. तर दिल्लीत मराठी लोकांसाठी एक भवन उभारले जाईल, त्यासाठी अर्थसंकल्पात हवी ती तरतूद केली जाईल, असे आश्वासन अजित पवारांनी साहित्य संमेलनाच्या मंचावरून दिले. याप्रसंगी साहित्य संमेलन आयोजन करण्यात सहभागी असलेल्या सर्वांचा सत्कार दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. एकूण १२ ठराव यावेळी साहित्य महामंडळाच्या वतीने मांडण्यात आले त्याला उपस्थित त्यांनी हात उंचावून अनुमोदन दिले.

२१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान साहित्य महामंडळाचे ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन दिल्लीत पार पडले. सरहद, पुणे या संस्थेने संमेलनाचे आयोजन केले होते. समारोपीय कार्यक्रमाला संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, निमंत्रक संजय नहार, उज्वला मेहेंदळे, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, इतिहासात तलवारीने दिल्ली जिंकली, आता सारस्वतांच्या विचारांनी दिल्ली जिंकली आहे. मराठी भाषेच्या सर्व प्रवाहांचा हा संगम आहे आणि मराठी भाषेचा महाकुंभ आहे. अभिजात मराठीचे हे पहिले संमेलन आहे आणि राजधानीत होत आहे. मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचे आभार. मी मुख्यमंत्री असताना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याची दखल संयोजक संजय नहार यांनी घेतली. तसेच संमेलनाचे निमंत्रक संजय नहार यांचे काम हिमालयाएवढे उंच आहे, असेही ते म्हणाले.

साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी छावा चित्रपटाचा उल्लेख केला होता. याचा संदर्भ देत छावा चित्रपट मराठीमध्येही येत असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी त्यांनी स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवारांचाही आवर्जून उल्लेख केला. दरम्यान, समारोपीय कार्यक्रमाला इथे उपस्थित लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत. माझ्या 'हलक्यात घेऊ नका' या विधानाची चर्चा होते मात्र ते अडीच वर्षापूर्वीच्या परिस्थितीसाठी असल्याचे म्हणाले. याचवेळी सर्वात जास्त सह्या करणारा आणि फोटोमध्ये येणारा मुख्यमंत्री आहे. लोकांच्या भावनांचा आदर राखण्यासाठी फोटोत यावे लागते. मात्र आपल्या एखाद्या सहीने कुणाचा जीव वाचत असेल तर तेही केले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

पुरस्कारामुळे काहींना त्रास झाला मात्र तोही पुरस्कारच

एकनाथ शिंदे म्हणाले की, साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मला महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देण्यात आला. देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला, त्यासाठी मी पात्र आहे की नाही माहिती नाही मात्र देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते आणि महादजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मला दिल्यामुळे काही लोकांना वाईट वाटले, ज्यांना वाईट वाटले ते माझा नेहमीच तिरस्कार करतात. मात्र त्यांचा तिरस्कारही माझ्यासाठी पुरस्कारासारखाच आहे, असे म्हणत संजय राऊत यांचे नाव न घेता शिंदे यांनी टोला लगावला.

माय मराठी सर्वांची...

माय मराठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची आहे, आपल्या सर्वांची आहे. वेळ आली तेव्हा ती तलवारीची भाषा होते, संतवाणी करताना ती थकत नाही आणि सेवा करताना अडखळत नाही. या माय मराठीची सेवा करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. आपली भाषा आपण जपली पाहिजे, आज अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' असे सांगावे लागत आहे. मराठी नाटक, चित्रपट, संगीत, कला, खाद्यकला हे सगळे मिळून मराठी संस्कृती तयार होते. या सगळ्या गोष्टींचा आदर करणारा मराठी समाज आपल्याला टिकवला पाहिजे, मराठी भाषेचा डंका दिल्लीत वाजत आहे. भाषा आपले अस्तित्व आहे. भाषा संपली तर आपले अस्तित्वही संपेल, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

दादांकडे पैशाची तिजोरी आहे- शिंदे

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, अजित पवारांकडे पैशाची तिजोरी आहे. त्यांच्या शेजारीच मराठी भाषेचे मंत्री बसले आहेत. त्यामुळे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काहीही कमी पडणार नाही. शासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत आणि प्रयत्न केले जातील.

...तर दिल्लीत शिवसृष्टी

मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासन कायम प्रयत्नशील आहे. राजधानी दिल्लीत जागा मिळाली तर दिल्लीतही शिवसृष्टी उभी करू अशी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ साकारत असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. साहित्य संमलेनाचा निधी ५० लाखांवरुन २ कोटी केला आहे. तसेच पुस्तकांचे गाव आपल्याकडे आहे. आता कवितांचे गाव साकारण्यासाठी प्रयत्न करू, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

नाशिकच्या भिमाबाई जोंधळे यांचा शासनाने सत्कार केला

नाशिकमध्ये भिमाबाई जोंधळे यांचे एक हॉटेल आहे. त्यामध्ये त्यांनी खाताना वाचण्याची सुविधा ठेवली आहे. त्यांचाही सत्कार राज्य शासनाने केला आहे. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पुस्तकांचे आणि खाद्यपदार्थांचे असे दोन माहितीपत्रक स्वतंत्र आहेत, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नाशिकमधील शाळेचेही उदाहरण यावेळी त्यांनी दिले. बदलापूरचे शाम जोशी यांच्या ग्रंथचळवळीचा, जुने ग्रंथ वाचनासाठी असलेल्या पुनश्च डॉट कॉम या संकेतस्थळाचा उल्लेख त्यांनी केला.

आमच्यात कुठलीही नाराजी नाहीः अजित पवार

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, साहित्यिकांच्या मेळ्यात उपस्थित राहता आले, हे स्वतःचे भाग्य समजतो. महायुतीचे सरकार आल्यापासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आम्ही तिघे २४ तास कॅमेरात आहोत. ऑफिसच्या बाहेर, घराच्या बाहेर मंत्रालयाच्या बाहेर, मंत्रालयात २४ तास कॅमेरे असतात. नऊ वाजता मंत्रालयात आले. ही काय बातमी आहे काय. हे दाखल झाले ते दाखल झाले कार्यक्रमात अशा बातम्या सुरू होतात. आमच्या ध्येय बोलीचा अभ्यास केला जातो. आमच्या चेहऱ्यावर हास्य आहे का? हे बघतात मी आल्यापासून मुद्दाम चेहऱ्यावर हास्य ठेवले आहे. आमच्यात कुठलेही नाराजी नाही, असे अजित पवार म्हणाले.

परवा एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द वापरला ‘मला हलक्यात घेऊ नका’ हे कोणाला म्हणाले हे नेमकं कोणाला म्हणले कळायला तयार नाही. आता हलक्यात मशाली घ्यायचं नाही का अजून कोणी घ्यायचं नाही, असे ते म्हणाले.

उद्घाटन सोहळ्याला उपस्थित न राहिल्याचे दुःख’

साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित न राहिल्याचे दुःख आहे, असे अजित पवार म्हणाले. त्याचे कारण असे आहे की, संमेलना अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांचे भाषण मी समाज माध्यमावर ऐकले. तेव्हा वाटलं की हे भाषण ऐकायला आपण प्रत्यक्ष सभागृहांमध्ये असायला हव होत. सात्विक-सोज्वळ व्यक्तिमत्व सोपे सोपे अर्थपूर्ण शब्द आणि शब्दातून ऐकू येणाऱ्या मंजुळ गोड नाद खूप प्रभावित करणारा होता. त्यांचे भाषण संपूच नाही असे वाटत होते. त्यांचे भाषण ऐकून साक्षात देवी सरस्वती मयूर आसनावरून सोडून त्यांच्या भाषणाच्या स्वागताला समोर आली असती. आणि म्हणाली असती तुझ्या भाषणांनी मी प्रसन्न झाले आहे आज पासून तुला आणि तुझ्या गोड मराठीला माझ्या दरबारात कायमच पहिले स्थान राहील आणि ते स्थान मी देते. पंतप्रधान यामुळेच प्रभावित झाले आणि म्हणाले ‘फार छान’, असे अजित पवार म्हणाले.

दिल्लीतील मराठी लोकांसाठी भवन होणार

महाराष्ट्र सदनाच्या उद्घाटन कार्यक्रमात दिवंगत प्रणव मुखर्जी म्हणाले होते की, राष्ट्रपती भवनाच्या नंतर कुठली देखणी इमारत असेल तर ती महाराष्ट्र सदन आहे. हे सदन खासदार, आमदार, मंत्री , मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यासाठी आहे. त्यामुळे दिल्लीत जो मराठी माणूस राहतो त्यांच्या करता एक अशी जागा पाहिजे त्यांना तिथे एकत्र भेटता आलं पाहिजे. अशा प्रकारच्या सभागृहासाठी दिल्लीतील जागा बघण्यास अजित पवार यांनी मंत्री उदय सामंत यांना सांगितले. या जागेसाठी कितीही निधी लागो त्याची घोषणा उद्याच्या अर्थसंकल्पात करू असे अजित पवार म्हणाले. मराठी भाषेच्या विकासासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते महाराष्ट्र शासन करेल, असे ते म्हणाले.

उदय सामंत यांचे कौतुक आणि फिरकी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री उदय सामंत यांचे कौतुक केले आणि फिरकी देखील घेतली. उद्योग मंत्रालयाबरोबर मराठी भाषा विभागाची जबाबदारी देखील उदय सामंत योग्य रीतीने सांभाळत आहेत. त्यांना मी पहिल्यांदा योग्य संधी माझ्या पक्षात दिली होती. त्यानंतर अनेक संधी दिल्या मात्र कुठे काय फिस्कटले की मला सोडून उदय सामंत उद्धव ठाकरेंकडे गेले. त्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. मात्र, जिथे उदय सामंत जातात तिथे अतिशय निष्ठेने काम करतात असे अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमदार छावा चित्रपट एकत्र बघणार

अजित पवार म्हणाले की, मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले आहे. विधिमंडळातील सदस्यांसह छावा चित्रपट पाहायचा. ४ मार्चला आम्ही सगळे विधिमंडळातल्या सदस्यांना तिथेच विधानसभेच्या समोर चित्रपट गृहात चित्रपट दाखवतोय.

सीमाभागातील लोकांच्या सोबत सरकार ठामपणे उभे

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरच्या भागातील लोकांसोबत सरकार ठामपणे उभे राहणार आहे, असे ते म्हणाले. सीमाभागातील लोकांना भेटून त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले असे अजित पवार म्हणाले. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचे सरकार सर्वोत्तरी प्रयत्न करेल. मराठीच्या प्रचारासाठी प्रसारासाठी निधी कमी पडू देणार नाही हे शब्द राज्याचा अर्थमंत्री म्हणून देतो, असेही ते म्हणाले. तरुण वयात असतानाच वडील सोडून गेले म्हणून कुटुंबाची जबाबदारी पडली त्यामुळे माझे वाचन झाले नाही, असे ते म्हणाले.

अजित पवारांनी मांडले दोन ठराव

अजित पवार म्हणाले की, एक ठराव असाही करा जर लेखक किंवा कवी असे स्वतःला म्हणावे वाटत असेल. तर त्यांनी किमान दुसऱ्या लेखकाचे कवींचे कमीत कमी पाच पुस्तके वाचावी आणि त्यातले कुठले आवडले यावर विस्ताराने लिहावे. तरच तुम्हाला लेखक आणि कवी म्हणण्यात येईल. दुसरा ठराव म्हणजे प्रतिथयश लेखकांनी फक्त जिल्हास्तरीय साहित्य संमेलन कवी संमेलनांना उद्घाटक म्हणून जावे. इतर तालुकास्तरीय गावांमधील शाळांमध्ये तरूणांना संधी द्यावी. काही साहित्यिकांनी प्रकाशकांनी आणि नवोदित मित्रांनी हे ठराव मांडायला सांगितले म्हणून ठराव मांडले, असे अजित पवार म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news