‘सुखोई-30 एमकेआय’ला मिळणार नवे ‘हृदय’!

हवाई दलाचा कणा असलेल्या विमानाला रशियाकडून दोन नव्या शक्तिशाली इंजिनची ऑफर
russia-offers-two-new-powerful-engines-for-air-force-aircraft
Published on
Updated on

मॉस्को/नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय हवाई दलाचा कणा असलेले ‘सुखोई-30 एमकेआय’ लढाऊ विमान सध्या इंजिनच्या समस्येमुळे मोठ्या डोकेदुखीला सामोरे जात आहे. यावर तोडगा म्हणून रशियाने भारतासमोर दोन शक्तिशाली इंजिनचे पर्याय ठेवले आहेत. आता तत्काळ उपाययोजना निवडून लढाऊ विमानांची ताकद वाढवायची की, भविष्याचा वेध घेत नव्या तंत्रज्ञानात गुंतवणूक करायची, या महत्त्वाच्या निर्णयाकडे भारताचे लक्ष लागले आहे. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात तब्बल 260 ‘सुखोई-30 एमकेआय’ विमाने आहेत, जी ‘ब्रह्मोस’सारख्या शक्तिशाली क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहेत. मात्र, या विमानांमध्ये वापरले जाणारे रशियन बनावटीचे AL-31FP इंजिन आता कालबाह्य ठरत आहे. चीनने J-20 आणि J-35 सारखी अत्याधुनिक स्टेल्थ विमाने तैनात केली असताना आणि पाकिस्तानही चीनकडून ही विमाने खरेदी करण्याच्या तयारीत असताना, भारताला आपल्या प्रमुख लढाऊ विमानाला जुन्या इंजिनच्या भरवशावर ठेवणे धोक्याचे ठरू शकते.

सध्याच्या इंजिनमधील समस्या काय?

कालबाह्य तंत्रज्ञान : 2000 साली बनवलेले हे इंजिन आता क्षमतेनुसार कामगिरी करू शकत नाही.

कमी सेवा क्षमता : या इंजिनची सेवा क्षमता (Service Life) फक्त 2,500 तास आहे.

खर्चिक देखभाल : याची दुरुस्ती (Overhauling) अत्यंत खर्चिक आहे.

जास्त इंधन वापर : इंजिन मोठ्या प्रमाणात इंधन वापरते.

सततचा बिघाड : इंजिनमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने विमानांच्या उड्डाणांवर परिणाम होत आहे.

रशियाने दिलेले दोन पर्याय

या पार्श्वभूमीवर रशियाने भारतासमोर दोन पर्याय ठेवले आहेत :

1) AL-41F1S इंजिन (तत्काळ उपाय) : हे इंजिन रशिया आपल्या Su-35 लढाऊ विमानात वापरत आहे. हे पूर्णपणे विकसित असून, ‘सुखोई-30’मध्ये कोणत्याही बदलाशिवाय बसवता येते. याची क्षमता सध्याच्या इंजिनपेक्षा खूप जास्त आहे.

थ्रस्ट (जोर) : 14,500 kgf

सेवा क्षमता : 4,000 तास

फायदा : हे इंजिन त्वरित उपलब्ध होईल आणि हवाई दलाच्या ताफ्याला तातडीने बळकटी देईल. यामुळे पुढील 10-12 वर्षांसाठी सुखोई विमाने मिशन-रेडी राहू शकतील.

2) 177S इंजिन (भविष्यातील ‘गेमचेंजर’) : हे एक नेक्स्ट जनरेशन अर्थात अत्याधुनिक इंजिन आहे. याची निर्मिती रशियाच्या सर्वात प्रगत Su-57 विमानातील इंजिनच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे.

थ्रस्ट (जोर) : 15,200 kgf

सेवा क्षमता : 6,000 तास

फायदा : हे इंजिन ‘सुखोई-30 एमकेआय’ची क्षमता प्रचंड वाढवेल. विमानाची रेंज, पेलोड क्षमता आणि विशेषतः चीन-पाकिस्तान सीमेवरील उंच प्रदेशात कामगिरी करण्याची ताकद कैकपटीने वाढेल.

भारतापुढील पेच

-177S इंजिन अजून पूर्णपणे विकसित झालेले नाही. याच्या विकासाचा खर्च भारताने उचलावा आणि बदल्यात रशिया तंत्रज्ञान हस्तांतरण (Technology Transfer) करेल, असा प्रस्ताव आहे. हे तंत्रज्ञान भारताला ‘तेजस एमके-2’ आणि ’AMCA’ यासारख्या स्वदेशी लढाऊ विमान प्रकल्पांसाठी वरदान ठरू शकते.

- त्यामुळे, हवाई दलाच्या तत्काळ गरजा पूर्ण करण्यासाठी कमी जोखमीचा AL-41F1S पर्याय निवडायचा की, भविष्यात मोठी झेप घेण्यासाठी 177S इंजिनच्या विकासात गुंतवणूक करायची, हा प्रश्न भारतासमोर आहे. तज्ज्ञांच्या मते, भारताला दोन्ही इंजिनची गरज असून, तत्काळ गरजा आणि भविष्यातील सामरिक सामर्थ्य यांचा समतोल साधणारा निर्णय घ्यावा लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news