

नवी दिल्ली : महाराष्ट्र केडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी रुपिंदर सिंह यांची केंद्रीय गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव आणि आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. कार्मिक मंत्रालयाच्या नियुक्ती समितीने आज यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली.
कार्मिक मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीत महाराष्ट्र संवर्गातील रुपिंदर सिंह यांच्या नियुक्तीव्यतिरिक्त आणखी सात प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये आंध्र प्रदेश केडरचे अनिल कुमार सिंघल यांना शिक्षण मंत्रालयात अतिरिक्त सचिव करण्यात आले आहे. तर सुशील कुमार लोहानी यांची पंचायत राज मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय मध्य प्रदेश कॅडरचे नितेश कुमार व्यास यांची गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिवपदी, बिहार कॅडरच्या विपिन कुमार यांची विमान वाहतूक मंत्रालयाच्या विमानतळ प्राधिकरणाच्या संचालकपदी, छत्तीसगड संवर्गातील सुबोध कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलाद मंत्रालय, अरुणाचल प्रदेश-गोवा-मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश कॅडरमधील अतिरिक्त सचिव आणि आर्थिक सल्लागार के. पी. कृष्णमूर्ती यांची राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे आणि भारतीय रेल्वे प्रशासकीय सेवेतील (आयआरएएस) अधिकारी संजिव नारायण माथूर यांची कृषी मंत्रालयात अतिरिक्त सचिव आणि आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.