

Rupee Depreciation TV AC and Fridge Prices Rise in the New Year
नवी दिल्ली : रुपयातील घसरणीमुळे सुट्या भागांसाठी आयातीवर अवलंबून असलेल्या एलईडी टीव्ही, फ्रीज आणि एअर कंडिशनर (एसी) यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती जानेवारीपासून महागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे एसी आणि फ्रीजसारख्या वस्तूंचे ऊर्जा कार्यक्षमता नियम एक जानेवारीपासून कडक होत आहे. अशा स्थित्यंतराच्या कालावधीतच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमतीवर दुहेरी दबाव वाढला आहे.
नवीन स्टार चिन्ह देण्यासाठीच्या नियमांमध्ये बदल केल्याने फ्रीजच्या किमती 3 ते 5 टक्क्यांनी वाढतील; तर एसीच्या किमतीत 7 ते 8 टक्क्यांची वाढ होईल. त्यातच डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने दोन्हीचा एकत्रित परिणाम 7 ते 10 टक्के एसीच्या किमती वाढतील.
तर फ्रीजच्या किमतीत 3 ते 7 टक्क्यांची वाढ जानेवारी महिन्यापासून होईल. एलईडी टीव्हीच्या किमतीतही 7 ते 10 टक्क्यांनी वाढ होईल. रुपयाची घसरण आणि कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने टीव्ही महागणार आहे.
गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या अप्लायन्सेस व्यवसायाचे प्रमुख कमल नंदी म्हणाले, रुपयाची घसरण आणि कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने एसी, फ्रीजसारख्या ग्राहकोपयोगी वस्तूंच्या निर्मितीचा खर्च वाढेल.
तसेच इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसाठी ऊर्जा सक्षमतेसाठी दिल्या जाणाऱ्या स्टार प्रणालीत 1 जानेवारीपासून बदल होत आहे. त्यामुळेही उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. आम्ही मार्च तिमाहीतील मागणी ट्रेंड पाहून एप्रिलमध्ये किमती वाढण्याबाबत निर्णय घेऊ.