

नवी दिल्ली : जुलै महिन्यात ४ ते ६ तारखेदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) देशभरातील प्रांत प्रचारकांची बैठक बोलावली आहे. दिल्लीतील आरएसएसचे कार्यालय ‘केशवकुंज’ येथे होणाऱ्या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे उपस्थित राहतील. तसेच ४६ प्रांतातील संघ प्रचारक बैठकीसाठी येणार आहेत. यावर्षी विजयादशमीपासून सुरु होणाऱ्या संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या वर्षभराच्या कार्यक्रमांवर बैठकीच चर्चा होईल.
देशाच्या विविध भागात नुकत्याच संपन्न झालेल्या संघटनेच्या प्रशिक्षण शिबिरांच्या निकालांचा अहवाल आणि आढावा बैठकीत घेतला जाणार आहे. या बैठकीसाठी सरसंघचालक भागवत २८ जून रोजी दिल्लीत येणार आहेत, असे संघाचे राष्ट्रीय प्रचार आणि माध्यम विभाग प्रमुख सुनील आंबेकर यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले. २०२५-२६ साठी सरसंघचालक मोहन भागवत यांचे दौरे नियोजन आणि इतर कार्यक्रम यांच्यावर देखील बैठकीत चर्चा होणार आहे.
संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल, सी. आर. मुकुंद, अरुण कुमार, रामदत्त, अतुल लिमये आणि आलोक कुमार यांच्यासह सर्व राष्ट्रीय स्तरावरील कार्यविभाग प्रमुख आणि इतर कार्यकारी परिषद सदस्य, सर्व प्रांत प्रचारक, सहप्रांत प्रचारक आणि क्षेत्र प्रचारक, सह क्षेत्र प्रचारक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. संघाच्या रचनेनुसार एकूण ११ प्रदेश आणि ४६ प्रांत आहेत. आरएसएसशी संबंधित विविध संघटनांचे अखिल भारतीय संघटन मंत्री देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.