नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतील नव्या मुख्यालयाने विरोधकांना संघ परिवाराला लक्ष्य बनवण्यासाठी दारूगोळा पुरवला आहे. भारतीय जनता पक्षाने दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या मुख्यमंत्री निवासस्थानाच्या नूतनीकरणावरून ‘शीशमहल’ असा हल्ला चढवला होता. विरोधक आता संघ मुख्यालयाबाबत हाच शब्द वापरत आहेत.
दिल्लीतील संघाचे मुख्यालय ‘केशव कुंज’ हे एक मोटे संकुलच आहे. सुमारे चार एकरच्या विस्तीर्ण क्षेत्रावर पसरलेल्या या क्षेत्रात पाच लाख चौरस फुटांचे बांधकाम आहे. तीन 12 मजली इमारती, 300 खोल्या, रुग्णालय, ग्रंथालय, निवासी सदनिका आणि हनुमान मंदिराचा त्यात समावेश आहे. केशव कुंजच्या उभारणीसाठी जवळपास 150 कोटी रुपयांचा खर्च आला असून 75 हजार जणांच्या देणगीतून हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. रा. स्व. संघाच्या प्रवासाचा हा नवा टप्पा सुरू होत असला तरी विरोधक त्याची संभावना ‘शीशमहल’ अशी करत आहेत.

