

Pahalgam Attack
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी मंगळवारी (दि.२९) संध्याकाळी सलग बैठकांचे सत्र सुरू होते. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही पंतप्रधान मोदींची भेट घेतली. ही भेट जवळपास दीड तास चालली. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत स्वतंत्र बैठक घेतली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि सरसंघचालक यांच्यामध्ये पहिल्यांदाच भेट झाली. त्यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जाते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत तयारी करत आहे. याच अनुषंगाने विविध स्तरावर सरकारच्या वतीने बैठका घेतल्या जात आहेत आणि रणनीती तयार केली जात आहे. सरसंघचालक मोहन भागवतांनी पंतप्रधानांची भेट घेऊन या सर्व गोष्टींना एक प्रकारे समर्थन दर्शवले आहेत. याचसाठी ही बैठक झाल्याचे समजते. या बैठकीमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यासह विविध विषयांवरही चर्चा झाल्याचे समजते.