नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वधेरा यांची सलग तिसऱ्या दिवशी ईडीने चौकशी केली. गुरूवारी सलग तिसऱ्या दिवशी जेव्हा रॉबर्ट वधेरा ईडी कार्यालयात पोहोचले तेव्हा प्रियंका गांधीही त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. ईडी चौकशीनंतर रॉबर्ट वधेरा म्हणाले की, चौकशीत कोणताही नवीन प्रश्न नव्हता. जर उद्या सार्वजनिक सुट्टी नसती तर मला माझा वाढदिवस ईडी कार्यालयात साजरा करावा लागला असता, असेही ते म्हणाले. ३ दिवसात जवळपास १३ तास रॉबर्ट वधेरा यांची चौकशी करण्यात आली.
हरियाणातील शिकोहापूर जमीन व्यवहार प्रकरणी गुरूवारी सलग तिसऱ्या दिवशी ईडीने रॉबर्ट वधेरा यांची चौकशी केली. ईडी कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी वधेरा म्हणाले की, मी सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे. मला २०१९ मध्येही हेच प्रश्न विचारले गेले होते. चौकशीत नवीन काही नाही. केंद्र सरकारच्या प्रचाराची आणि तपास यंत्रणांचा गैरवापर करण्याची ही शैली आहे. मात्र आम्ही घाबरणार नाही, हे सहन करण्याची ताकद आमच्यात आहे. यापूर्वी २३ हजार कागदपत्रे दिल्याचेही वधेरा म्हणाले.