Airport GPS spoofing incidents | देशातील प्रमुख विमानतळांवर जीपीएस स्पूफिंगचे वाढते प्रकार

विमान वाहतुकीला धोका निर्माण केल्याची सरकारची माहिती
Airport GPS spoofing incidents
Airport GPS spoofing incidents | देशातील प्रमुख विमानतळांवर जीपीएस स्पूफिंगचे वाढते प्रकार
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दिल्ली, मुंबई, कोलकाता, अमृतसर, हैदराबाद, बंगळूर आणि चेन्नई देशातील प्रमुख विमानतळांवर जीपीएस स्पूफिंग आणि हस्तक्षेपाच्या घटनांची नोंद झाली असल्याची माहिती केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने सोमवारी दिली. वायएसआरसीपीचे खासदार एस. निरंजन रेड्डी यांनी राज्यसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांना लेखी उत्तर देताना हवाई वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात जीपीएस स्पूफिंग झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दिल्लीच्या आयजीआयए विमानतळावर रनवे 10 वर जीपीएस-आधारित लँडिंग प्रक्रिया वापरताना काही विमानांनी स्पूफिंगचा अनुभव घेतल्याचे मंत्र्यांनी नमूद केले. तथापि, त्वरित आकस्मिक कार्यप्रणाली वापरल्यामुळे विमानांच्या हालचालींवर कोणताही परिणाम झाला नाही. नोव्हेंबर 2023 पासून डीजीसीएने जीपीएस जॅमिंग/स्पूफिंगच्या घटनांची नोंद करणे बंधनकारक केल्यानंतर इतर प्रमुख विमानतळांवरूनही तसे नियमित अहवाल प्राप्त होत आहेत.

स्रोत ओळखण्यासाठी डब्ल्यूएमओ आणि एएआय सक्रिय

या हस्तक्षेपाचा स्रोत ओळखण्यासाठी वायरलेस मॉनिटरिंग ऑर्गनायझेशन आणि एअरपोर्टस् अथॉरिटी ऑफ इंडिया यांना निर्देश देण्यात आले आहेत. डीजीसीए आणि एएआयने दिलेल्या अंदाजित स्पूफिंग स्थानाच्या तपशिलांच्या आधारावर, डब्ल्यूएमओला अधिक संसाधने वापरण्यास सांगण्यात आले आहे.

मंत्र्यांनी सांगितले की, जागतिक स्तरावर स्वीकारलेल्या सर्वोत्तम पद्धतींनुसार, पारंपरिक (ग्राऊंड आधारित) नेव्हिगेशन आणि पाळत ठेवणार्‍या पायाभूत सुविधांचे किमान ऑपरेटिंग नेटवर्क कायम ठेवले आहे. सायबर धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी एएआय प्रगत सायबर सुरक्षा साधनांची अंमलबजावणी करत आहे.

देशातील सात प्रमुख विमानतळांवर जीपीएस स्पूफिंगच्या घटनांची नोंद.

दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावर येथे रनवे 10 वर लँडिंग दरम्यान स्पूफिंगची नोंद.

हस्तक्षेपाचा स्रोत ओळखण्यासाठी डब्ल्यूएमओला संसाधने वापरण्याचे निर्देश.

सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी कडून प्रगत उपायांची अंमलबजावणी.

जीपीएस स्पूफिंग म्हणजे काय?

जीपीएस स्पूफिंग म्हणजे तुमच्या ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम रिसिव्हरला जाणूनबुजून फसवणे होय. तुमच्या जीपीएस रिसिव्हरला असे वाटायला लावायचे की, तुम्ही प्रत्यक्षात असलेल्या ठिकाणाऐवजी तुम्ही दुसर्‍या ठिकाणी आहात.

हॅकर्स किंवा हल्लेखोर खोटे जीपीएस सिग्नल तयार करतात आणि ते तुमच्या डिव्हाईसकडे (उदा. विमान, जहाज, फोन) पाठवतात. तुमचे डिव्हाईस त्या खोट्या सिग्नलला खरे मानून तुमचे स्थान आणि वेळेची माहिती चुकीची दाखवू लागते. याचा उपयोग विमान वाहतूक, संरक्षण आणि आर्थिक व्यवहारांसारख्या संवेदनशील क्षेत्रांमध्ये दिशाभूल करण्यासाठी किंवा गोंधळ निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news