

बागलकोट : आर्थिक स्थिती सक्षम नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना गुवणत्ता असूनही उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागते; मात्र समाजातील दानशुरांमुळे काही विद्यार्थ्यांना आपले भविष्य उज्ज्वल करण्याची संधी मिळते. असे दानशूर अगदी आजुबाजूचे असू शकतात किंवा लांबवरचेही...ते सामान्य लोक असू शकतात किंवा सेलेब्रिटीही! त्यासाठी लागते फक्त कणव आणि सामाजिक जाणीव. अशीच जाणीव क्रिकेटपटू ऋषभ पंतने दाखवत पैशांअभावी पुढचे शिक्षण थांबण्याची भीती असलेल्या विद्यार्थिनीचे कॉलेजचे शुल्क अदा करून आपण फक्त यष्टिरक्षक नाही, तर शिक्षणरक्षकही असल्याचे दाखवून दिले आहे.
बागलकोट जिल्ह्यातील रबकवी येथील ज्योती कनबूर या विद्यार्थिनीने बारावीत 83 टक्के गुण मिळविले. तिला बीसीए अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा होता. तिचे वडील तीर्थय्या हे गावात चहाचा गाडा चालवतात. त्यांना ज्योतीच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली 40 हजारांची रक्कम जमवणे अवघड जात होते. तीर्थय्यांनी आपल्या ओळखीचे एक ठेकेदार अनिल हुनशीकट्टी यांना ही अडचण सांगितली. तसेच बीएलडीई कॉलेजमध्ये बीसीएला प्रवेश मिळवून द्यावा, अशी विनंती केली.
आयपीएलसाठी बंगळूरला वांरवार जाणार्या हुनशीकट्टी यांची क्रिकेटपटू पंतशी स्पर्धेदरम्यान जवळीक झाली आहे. त्यांनी पंतशी संपर्क साधला आणि ज्योतीच्या घरच्या परिस्थितीची कल्पना दिली. लगेचच पंतने 40 हजार रुपयांची पहिल्या सेमिस्टरची फी महाविद्यालयाच्या खात्यात पाठवली. शिवाय भविष्यातही अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले.
ज्योतीला आर्थिक मदत करून ऋषभ पंतने माणुसकीचे दर्शन घडविले आहे. परिस्थितीअभावी शिक्षण थांबणार्या विद्यार्थ्यांसाठी असेच ऋषभ पंत निर्माण व्हावेत, अशी प्रतिक्रिया तीर्थय्या यांनी व्यक्त केली.