

अनिल साक्षी
जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही वर्षांत कर्करोगाचा फैलाव वेगाने होत असल्याचे अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. २०१८ ते २०२४ या सात वर्षांच्या कालावधीत केवळ काश्मीर खोऱ्यात कर्करोगाचे ५० हजार ५५१ रुग्ण आढळून आले आहेत.
माहिती अधिकार कार्यकर्ते सय्यद आदिल यांनी दाखल केलेल्या अर्जातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानुसार, २०१५ ते २०२५ या दहा वर्षांच्या कालावधीत जम्मू येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) कर्करोगाचे २२ हजार १३० रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये फुफ्फुसांचा कर्करोग सर्वाधिक प्रमाणात आढळून आला आहे.
गेल्या दशकात जम्मू-काश्मीरमध्ये फुफ्फुसांच्या कर्करोगाचे ३२७२ रुग्ण आढळले असून, हा सर्वाधिक आढळणारा कर्करोग ठरला आहे. त्यापाठोपाठ स्तनाचा कर्करोग (१७५६ रुग्ण) आणि तोंडाचा कर्करोग (१०२३ रुग्ण) यांचा क्रमांक लागतो. कर्करोगतज्ज्ञांच्या मते, धूम्रपान, तंबाखूचे विविध प्रकार, दुसऱ्यांच्या धूम्रपानातून निर्माण होणाऱ्या धुराचा संपर्क (सेकंड-हँड स्मोक), घरातील व बाहेरील वायूप्रदूषण तसेच काही व्यावसायिक कारणांमुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. जागतिक स्तरावर सर्व कर्करोगांपैकी सुमारे १२.४ टक्के रुग्ण फुफ्फुसांच्या कर्करोगाचे असतात, तर भारतात हे प्रमाण सुमारे ५.८ टक्के आहे. जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीही याच प्रवाहाशी सुसंगत असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले.
तज्ज्ञांनी सांगितले की, कर्करोगाचे निदान सुरुवातीच्या टप्प्यात झाल्यास उपचारांचे यश आणि रुग्णाच्या जगण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये अनेक रुग्ण आजार गंभीर अवस्थेत पोहोचल्यानंतरच रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे जनजागृती, नियमित आरोग्य तपासणी, तंबाखूमुक्त जीवनशैली आणि अत्याधुनिक निदान सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी अधोरेखित केले.
अधिकृत आकडेवारीनुसार, २०१८ मध्ये काश्मीरमध्ये कर्करोगाचे ६६४९ रुग्ण होते. २०१९ मध्ये ६३७४, २०२० मध्ये ६११३, २०२१ मध्ये ७०९०, २०२२ मध्ये ७८४६, २०२३ मध्ये ८१२४ आणि २०२४ मध्ये ८३५५ रुग्णांची नोंद झाली. २०१९ ते २०२० या काळात कोव्हिड -१९ महामारीमुळे निदान आणि नोंदणीवर परिणाम झाल्याने काहीशी घट दिसली असली, तरी त्यानंतर रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.