पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी घेतलेली देशाचे माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांची वैयक्तिक पत्रे परत करावीत, अशी मागणी पंतप्रधान संग्रहालयाने केली आहे. यासंदर्भात लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे.
२००८ मध्ये काँग्रेस नेतृत्त्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार होते. यावेळी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान संग्रहालयात असणारी पंडित नेहरु यांची पत्रे मागवली होती.पंतप्रधान संग्रहालयाचे सदस्य रिझवान कादरी यांच्या वतीने राहुल गांधींना १० डिसेंबर रोजी हे पत्र लिहिले आहे. या पत्रात कादरी यांनी राहुल गांधींना सोनिया गांधींना दिलेली पत्रे, फोटो कॉपी आणि डिजिटल कॉपी परत करण्याचे आवाहन केले आहे. याआधी संग्रहालयाने सप्टेंबरमध्ये सोनिया गांधी यांना पत्रही लिहिले होते.
रिजवान कादरी यांनी वृत्तसंस्था ANIशी बोलताना सांगितले की, सप्टेंबर 2024 मध्ये मी सोनिया गांधींना पत्र लिहून विनंती केली की, २००८ मध्ये नेहरू मेमोरिअल म्युझियम आणि लायब्ररीमधून घेतलेली पत्रे संस्थेकडे परत करावीत. संबंधित पत्रे ही आम्हाला पाहण्याची परवानगी दिली जावी. तसेच ती स्कॅन करुन एक प्रत आम्हाला उपलब्ध करून द्यावी जेणेकरून आम्ही त्यांचा अभ्यास करू शकू, अशी विनंती मी विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांना पत्राव्दारे केली आहे.
पंडित नेहरूंची ही वैयक्तिक पत्रे ऐतिहासिक मानली जातात. यापूर्वी ही पत्रे जवाहरलाल नेहरू मेमोरिअलकडे होती. १९७१ मध्ये नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीला देण्यात आली होती. आता हे नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी हे पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय म्हणून ओळखले जाते. पंडित नेहरू यांनी अल्बर्ट आइनस्टाईन,एडविना माऊंटबॅटन, जयप्रकाश नारायण, पद्मजा नायडू, विजय लक्ष्मी पंडित, अरुणा असफ अली, बाबू जगजीवन राम आणि गोविंद वल्लभ पंत इत्यादी महान व्यक्तींमधील संभाषणांवर आधारित ही पत्रे आहेत.