नवी दिल्ली: दिल्लीतील रोहिणी परिसरातील एका ७२ वर्षीय निवृत्त अभियंत्याला आठ तास "डिजिटल अटकेवर" ठेवल्यानंतर १० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अभियंत्याच्या तक्रारीवरून, दिल्ली पोलिसांच्या सायबर शाखेने एफआयआर दाखल केला आहे. यानंतर ६० लाख रुपये गोठवण्यात पोलिसांनी यश मिळाले आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही फसवणूक परदेशातून केली असल्याचा संशय आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्यांना तैवानमधून पार्सलबाबत फोन आला होता. कॉलरने त्यांना सांगितले की, त्यांचे नाव असलेले पार्सल मुंबई विमानतळावर रोखण्यात आले आहे. पार्सलमध्ये प्रतिबंधित ड्रग्स आहेत आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी त्यांच्याशी बोलतील. त्यानंतर व्हिडिओ कॉलवर त्यांना डिजीटल अटक करण्यात आले. व्हिडिओ कॉल दरम्यान, अभियंत्याला किमान आठ तास डिजिटल अटकेत ठेवण्यात आले होते. या दरम्यान आरोपींनी वेगवेगळ्या बँक खात्यात १० कोटी ३० लाख रुपये हस्तांतरित करण्यास भाग पाडले.