नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने महिलांच्या छेडछाडीवर त्वरित कारवाई करण्यासाठी 'शी बॉक्स' पोर्टलचे नूतनीकरण केले. यावेळी, महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी म्हणाल्या की, नवीन ‘शी-बॉक्स पोर्टल’ देशभरात स्थापन झालेल्या अंतर्गत समित्या आणि स्थानिक समित्या संबंधित माहितीचे केंद्रीकृत भांडार म्हणून काम करेल. यामध्ये सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रांचा समावेश आहे. हे तक्रारी नोंदवण्यासाठी, त्यांच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी आणि तक्रारींवर वेळेवर कारवाई सुनिश्चित करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करेल.
हे पोर्टल तक्रारींचे खात्रीशीर निवारण आणि सुव्यवस्थित प्रक्रिया प्रदान करेल. हे पोर्टल नियुक्त नोडल ऑफिसर मार्फत तक्रारींचे रिअल-टाइम मॉनिटरिंग सुलभ करेल. त्या म्हणाल्या की, कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी लैंगिक छळ (प्रतिबंध आणि निवारण) कायदा, २०१३ आहे. या अनुषंगाने, शी-बॉक्स पोर्टल हे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या तक्रारींचे निराकरण आणि व्यवस्थापन करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.